अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्हा वार्षिक नियोजनासह सरकारच्या पैशातून उभी केलेली विकास कामे जनतेच्या हिताची आहेत काय? त्याचा जनतेला किती फायदा झाला, या योजनांमुळे मानवी विकास निर्देशांकांत वाढ झाली का? हे तपासण्यात येणार आहे. अशा प्रकारे सरकारी योजनांच्या खर्चाची तपासणी करणारा नगर जिल्हा राज्यात पहिला जिल्हा ठरणार आहे. तसेच जिल्ह्यातील 300 शाळामध्ये सौर उर्जा प्रकल्प राबविण्यात येणार असून जिल्ह्यातील कन्या विद्यालयात शंभर टक्के सीसीटीव्ही यंत्रणा बसवून त्या ‘सेफ स्कूल’ बनविणार असल्याचा विश्वास जलसंपदा तथा नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेनंतर नगरच्या जिल्हा नियोजन समितीच्या पहिल्या बैठकीनंतर पालकमंत्री विखे पाटील पत्रकार परिषदेत बोलत होते.
यावेळी आ. मोनिका राजळे, आ. विठ्ठलराव लंघे, आ. काशिनाथ दाते, आ. हेमंत ओगले आदी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, येत्या वर्षाच्या जिल्हा वार्षिक नियोजन आराखड्यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांचे डीजिटायझेशन, चौथीच्या मुलांना टॅब तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त तलाव दुरुस्ती, अंगणवाड्या निर्मिती, पुरातन बारव संवर्धन, शाळांतून सौरउर्जा, अशी कामे तिनशेच्या पटीत केली जाणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या 2024-2025 वर्षाचा मूळ आराखडा 730 कोटींचा होता, तो वाढून 923 कोटी झाला. यापैकी 700 कोटींची विकास कामे मंजूर आहेत. यापैकी काही पूर्ण झाली तर काहींचे काम सुरू आहे. येत्या दोन महिन्यात ही कामे पूर्ण होऊन 100 टक्के खर्च होईल, असा विश्वास व्यक्त करून विखे म्हणाले, येत्या 2025-2026 वर्षाचा आराखडा शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार 702 कोटींचा आहे व तो आणखी दीडशे कोटींनी वाढवून देण्याची मागणी शासनाकडे केली आहे.
यंदाच्या आराखड्यात जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षणावर विशेष लक्ष दिले जाणार आहे. जिल्हा नियोजन आराखड्यातून विविध शाळांतून 500 नव्या वर्ग खोल्या बांधण्यात येणार आहेत. प्रत्येक शाळा डीजिटल केली जाणार असून चौथीच्या मुलांना इन्फोसिस कंपनी 1400 टॅब देणार आहे व राहिलेल्या मुलांसाठी कंपन्यांच्या सीएसआर फंडातून निधी मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त तिनशेच्या पटीत विविध विकास कामे जिल्हाभरात केली जाणार असल्याचे मंत्री विखेंनी स्पष्ट केले. यात 300 तलावांची दुरुस्ती करून त्यांच्यातील गाळ काढणे, 300 नवीन अंगणवाड्या बांधणे व त्यांना सौरउर्जा सुविधा देणे, 300 चौकांचे सुशोभिकरण करणे, मुलींच्या तीनशे शाळांत सीसीटीव्ही बसवणे, 300 पुरातन बारवांचे संवर्धन करण्याचा विशेष कार्यक्रम राबवला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नेवाशाच्या ज्ञानेश्वर सृष्टी विकास आराखड्यासाठी वाढीव निधीची मागणी शासनाकडे केली आहे, असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा येत्या 10 दिवसांत विभागनिहाय आढावा घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दरम्यान, प्रधान मंत्री आवास योजनेतून 97 टक्के घरे पूर्ण झाली असून अहिल्यानगर जिल्हा राज्यात प्रथम आला आहे. याबद्दल सर्व संबंधित अधिकार्यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले.
केले ठराव व घेतले निर्णय
- शाळांना आकारला जाणारा व्यावसायिक वीज दर मागे घेऊन शाळांना मोफत वीज देण्याचा ठराव करण्यात आला.
- पाण्याचा प्रचंड उपसा झाल्याने ज्या गावांतून पाणी उपसा बंदी केली गेली आहे, ती गावे महावितरणने डार्क झोनमध्ये टाकली आहेत व त्यामुळे या गावांतून सौर उर्जा योजना दिली जात नाही. या पार्श्वभूमीवर, डार्क झोनची ही अट शिथील करण्याचा ठराव करण्यात आला.
- यंदा जिल्ह्याचा साहसी पर्यटन आराखडा केला जाणार आहे.
- 15 तीर्थक्षत्रांना क वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दिली मान्यता
- शाळांतील शौचालयांची स्वच्छता, देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी ग्रामसेवकांवर सोपविण्यात आली.
- नगरपालिका हद्दीत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीच्या देखभालीची जबाबदारी स्थानिक पोलीस यंत्रणेवर
- सरकारी जागेवरील अतिक्रमणे काढण्यासोबत अतिक्रमण केलेल्यांचे पुनव्रसन करण्यासाठी स्वतंत्रणे बैठक बोलवणार.