अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ‘द्राक्ष पिकासाठी प्लास्टिक कव्हर तंत्रज्ञानासाठी अर्थसहाय्य’ हा प्रकल्प राबविण्यासाठी 6 कोटी 14 लाख 04 हजार रुपयांच्या रकमेच्या कार्यक्रमास कृषी विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय कृषी विकास योजना आणि लाभार्थी यांच्यात 50-50 या प्रमाणात राबविण्यात येणार आहे. याचा लाभ द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना होणार आहे. नगर जिल्ह्यातील राहाता, संगमनेर, राहुरी व अन्य भागात द्राक्ष पीक घेतले जाते. त्यामुळे या योजनेचा फायदा शेतकर्यांना होणार आहे.
मागील काही वर्षांपासून अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, गारपीट आदी हवामान बदलाच्या संकटातून शेती जात असल्याने शेतकर्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. नुकसानीमुळे द्राक्ष उत्पादकांचे मनोधैर्य खचून जात होते. फुलोरा अवस्थेतील नुकसान, घडकुज, द्राक्षमण्यांना तडे जाणे, रोगांच्या प्रादुर्भावामुळे प्रतवारी घटणे, अशा अनेक अडचणी येत आहेत. यामुळे द्राक्ष उत्पादकांचे प्रचंड नुकसान होत आहे. हे नुकसान टाळण्यासाठी उपाय म्हणून सरकारने हा प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
या योजनेसाठी मंजूर निधीपैकी केंद्राचा हिस्सा 60 टक्के व राज्य शासनाचा हिस्सा 40 टक्के राहील. प्रकल्पांतर्गत लक्षांकाचे व निधीचे वाटप द्राक्ष पिकाच्या क्षेत्रानुसार जिल्हानिहाय मंडळ स्तरावर करण्यात येणार आहे. प्रकल्पांतर्गत महाडिबीटी प्रणालीवर लाभार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर लाभार्थ्यांची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. निवडलेल्या लाभार्थ्यांना सक्षम प्राधिकारी यांनी पूर्वसंमती दिल्यानंतर तसेच काम पूर्ण होऊन मोका तपासणी झाल्यानंतर अनुदान आधार लिंक लाभार्थ्यांच्या वर्ग खात्यात वर्ग करण्यात येणार आहे.