Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजकादवा सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

कादवा सहकारी साखर कारखाना विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन

ओझे l वार्ताहर Oze

- Advertisement -

कादवा सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. यावेळी बोलताना कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे यांनी बदलत्या काळानुसार निर्णय घेणे आवश्यक असल्याचे सांगत कारखान्याच्या विस्तारीकरणाची गरज स्पष्ट केली.

सध्या कारखान्याची 2500 मेट्रिक टन प्रतिदिन गाळप क्षमता असून ती वाढवून 3500 मेट्रिक टन प्रतिदिन करण्यात येणार आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वीची जुनी यंत्रसामग्री झाल्याने गाळप हंगामात तांत्रिक बिघाड निर्माण होत असून त्याचा उत्पादनावर परिणाम होत आहे. तसेच कमी गाळप क्षमतेमुळे ऊसतोड वेळेत पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत असल्याने कमी कालावधीत अधिक गाळप करणे आवश्यक झाले आहे.

श्रीराम शेटे यांनी सांगितले की, विस्तारीकरणासाठी शासनाच्या हमीची गरज नाही. यापूर्वी करण्यात आलेल्या विस्तारीकरण तसेच डिस्टिलरी प्रकल्पासाठी घेतलेल्या कर्जाची संपूर्ण परतफेड कारखान्याने केली आहे. नवीन विस्तारीकरणामुळे कमी दिवसांत अधिक गाळप शक्य होणार असून भुस्याची बचत, उत्पादनातील कार्यक्षमता वाढ आणि साखर उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. पुढील हंगाम सुरु होण्यापूर्वी विस्तारीकरणाचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

विस्तारीकरणानंतर अधिक प्रमाणात मोलॅसिस उपलब्ध होणार असून इथेनॉल प्रकल्प वर्षभर चालविणे शक्य होईल. भविष्यात सीएनजी प्रकल्प सुरू करण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांनी ऊस लागवडीखालील क्षेत्र वाढवून एकरी उत्पादन वाढविण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी मंत्री नरहरी झिरवाळ यांनी कादवा कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक करताना, “कादवा कारखान्याचे नवीन पर्व सुरू झाले आहे. जिल्ह्यातील सहकारी तत्त्वावरील हा एकमेव साखर कारखाना असून 1250 मेट्रिक टन क्षमतेवरून 2500 मेट्रिक टन आणि आता नव्याने 3500 मेट्रिक टन क्षमतेपर्यंत कामास भूमिपूजन कार्यक्रमाने सुरुवात झालेली वाटचाल उल्लेखनीय आहे. इथेनॉल प्रकल्प ही सुरु आहे, काळानुसार बदल आवश्यक असून कारखान्याची वाटचाल राज्यासाठी आदर्शवत ठरत आहे. शेतकरी व कारखान्याच्या हितासाठी आवश्यक वीज, पाणी, रस्ते आदी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.

प्रारंभी मंत्री नरहरी झिरवाळ व माजी जिल्हा परिषद सदस्य विलास कड यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक शहाजी सोमवंशी यांनी केले. माजी संचालक संजय पडोळ यांनी मार्गदर्शन केले तर आभार संचालक सुकदेव जाधव यांनी मानले.

यावेळी माजी आमदार उत्तमबाबा भालेराव, विश्वासराव देशमुख, अरुण मुळाणे, सदाशिव शेळके, रामकृष्ण तिडके, साहेबराव पाटील, बाबुराव डोखळे, जयराम डोखळे, विष्णुपंत पाटील, हरीश नगरकर, अशोक वाघ, अशोक भालेराव यांच्यासह सर्व संचालक, सभासद, अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ठेवींचा ओघ सुरूच
इथेनॉल प्रकल्पाच्या उभारणीवेळी सभासदांना ठेवी ठेवण्याचे केलेले आवाहन मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले होते. आता 3500 मेट्रिक टन विस्तारीकरण प्रकल्पासाठीही सभासदांना ठेवी ठेवण्याचे आवाहन करण्यात आले असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. अनेक सभासदांनी कारखान्याकडे ठेवी ठेवत सहकार्य केले असून त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. ज्यांना शक्य असेल त्यांनी कारखान्याकडे ठेवी ठेवाव्यात,जेव्हा गरज पडेल तेव्हा त्वरित ठेव परत दिली जाईल त्यावर नियमानुसार व्याज दिले जाईल असे आवाहन व्यवस्थापनाकडून करण्यात आले.

ताज्या बातम्या

राज-का-रण : बैल गेला अन झोप केला!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक विधान परिषद निवडणुकीत दोन अपक्षांच्या माघारीसाठी भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांना जी डोकेफोड करावी लागली ती त्यांनी...