अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महाराष्ट्र सरकारने एमपीआयडी (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण अधिनियम) कायद्यानुसार ‘ग्रो-मोअर’ संबंधित पाच वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले आहेत. गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून कंपनीच्या संचालकांनी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान, या गुन्ह्यातील संशयित आरोपींच्या सहा मालमत्ता व संबंधित बँक खाती सील करण्याचा एमपीआयडी प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार शासनाने जप्तीचे आदेश काढले असून जप्त मालमत्तांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शिर्डी विभागाच्या उपविभागीय दंडाधिकार्यांची ‘सक्षम प्राधिकारी’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी शासनाने हे पाऊल उचलले आहे.
ग्रो-मोअर कंपनीचे मुख्य संशयित आरोपी भूपेंद्र सावळे व त्याच्या साथीदारांनी गुंतवणूकदारांना दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून अनेकांनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली; मात्र ठरलेला परतावा तसेच मूळ रक्कम न देता गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात प्रथम गुन्हा दाखल झाला. त्यानंतर शिर्डी पोलीस ठाण्यातही स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला. या दोन्ही गुन्ह्यांचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक युवराज आठरे हे तपास करीत आहेत. या प्रकरणात आतापर्यंत भूपेंद्र राजाराम सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी), संदीप भास्कर सावळे (रा. श्रीकृष्णनगर, शिर्डी) आणि सुबोध सुकदेव पाटील (रा. साईप्रसादनगर, शिर्डी) यांना अटक करण्यात आली आहे.
शिरसगाव, शिर्डीसह नांदुर्खीतील सहा मालमत्ता होणार जप्त
संशयित आरोपी भूपेंद्र सावळे यांची शिर्डी येथील शेतजमीन व राहते घर, शिरसगाव (ता. श्रीरामपूर) येथील प्लॉट, भाऊसाहेब आनंदा थोरात याचे शिर्डी येथील घर, राजाराम भटू सावळे याची शिर्डी येथील शेतजमीन तसेच नांदुर्खी (ता. राहाता) येथील शेतजमीन यांचा समावेश आहे.
25 खात्यांवरील रक्कम सील
ग्रो-मोअर कंपनीसह भूपेंद्र सावळे, संदीप सावळे, भाऊसाहेब थोरात, मयुरी किराणा अॅण्ड जनरल स्टोअर, राजाराम सावळे, सुबोध सावळे, अरुण नंदन, आयुराज बिल्डकॉन, सीमा नंदन, इनोव्हेटिव टच सोल्युशन आणि पूजा गोकुळ पोटिडे यांच्या विविध बँकांतील एकुण 25 खात्यांवरील रक्कम सील केली असून ती जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहे. याशिवाय पतसंस्थांमधील पाच मुदत ठेव (एफडी) तसेच एलआयसीमधील सहा खात्यांवरील रक्कमही जप्त करण्यात आली आहे. याशिवाय संशयित आरोपींनी विविध बँकांमध्ये तारण ठेवलेले सुमारे 84 लाख 81 हजार 977 रुपयांचे सोने जप्तीचे आदेश आहे.





