Monday, April 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजChhagan Bhujbal : धीरेंद्र शास्त्री, संजय गायकवाड, टीसीएस ते मराठी भाषा सक्ती;...

Chhagan Bhujbal : धीरेंद्र शास्त्री, संजय गायकवाड, टीसीएस ते मराठी भाषा सक्ती; मंत्री भुजबळ सर्व विषयांवर स्पष्टपणे बोलले, नेमकं काय म्हणाले?

येवला | प्रतिनिधी | Yeola 

शेतकरी (Farmer) कर्जमाफीबाबत सरकार सकारात्मक आहे. शेतकऱ्यांसाठी शासनाने (Government) विविध योजना सुरू केल्या. मात्र, अनेक उद्योगधंद्यांना मदत केली जाते तसेच शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात मदत केली गेली पाहिजे. शेतकऱ्याला जगवलाच पाहिजे, शेतकरी जगला तरच जग जगेल. त्यांना अडचणीच्या काळात मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे, असे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Minister Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. येवला दौऱ्यावर आलेले मंत्री भुजबळ आपल्या संपर्क कार्यालयात पत्रकारांशी बोलत होते.

- Advertisement -

धार्मिक व ऐतिहासिक व्यक्तींविषयी वादग्रस्त विधानांबाबत बोलताना त्यांनी धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांच्यावर टीका केली. छत्रपती शिवाजी महाराज आणि इतर महान व्यक्तींविषयी पूर्ण माहिती नसताना नवीन इतिहास मांडणे योग्य नाही. अशा विधानांचा निषेध व्हायलाच हवा, मी देखील शास्त्री यांचा निषेध करतो, असे भुजबळ यांनी सांगितले. राज्यातील काही अंधश्रद्धाजन्य घटनांवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. नाशिक ही संतांची भूमी आहे. काही मोजक्या नतदृष्ट लोकांमुळे सर्व साधू-संत बदनाम होऊ नयेत. पोलिसांना पोलिसांचे काम करू द्या, पोलिसांनीही नेटाने काम करावे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे, अशी भूमिका मंत्री भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात (Nashik District) उघडकीस येत असलेल्या भोंदू बाबांच्या प्रकरणांवर बोलताना स्पष्ट केली.

पुण्यातील बॅनर प्रकरणावर बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, मलाही वाटतं सुनेत्राताई एक ना एक दिवस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री झाल्या पाहिजे. अनेक महिला मुख्यमंत्री इतर राज्यात होऊन गेल्या आहेत. महाराष्ट्रात देखील महिला मुख्यमंत्री झाल्या पाहिजे. मात्र, अशा बॅनरबाजीमुळे त्यांचं नुकसान होणार आहे हे लक्षात असू द्या. बीजेपीची लोक उद्या म्हणतील तुम्ही आमचे पद घेणार आहात का ? आज ती वेळ नाही आणि मुख्यमंत्री हे पद देखील खाली नाही. आपण ज्यांचे कार्यकर्ते आहोत निष्ठावंत आहोत हे दाखवण्याची काही गरज नाही. बॅनर वरील उल्लेखामुळे अनेक पक्षांना आपण दुखावतो आणि त्यामुळे आपलंच नुकसान होतं हे कार्यकर्त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, असे त्यांनी म्हटले.

टीसीएस प्रकरणावर (TCS Case) बोलताना मंत्री भुजबळ म्हणाले, टीसीएस कंपनी महाराष्ट्रात नव्हे, अख्या भारतासह जगभरात आहे. पोलिसांनी त्यांचं काम करावं, जे कोणी चुकीचे वागले असतील त्यांना शिक्षा करावी. मात्र उगाच टीसीएस कंपनीला बदनाम करू नये. ही कंपनी नाशिक मधून गेली तर दुसरी कंपनी निश्चित येणार नाही. काही व्यक्तींच्या चुकीमुळे संपूर्ण कंपनीला बदनाम करणे अयोग्य आहे. दोषींवर कारवाई करा, पण उद्योगांना धक्का लागू देऊ नका. तर आमदार संजय गायकवाड प्रकरणावर बोलतांना मंत्री भुजबळ म्हणजे मुख्यमंत्री यांनी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे यांनी कान टोचले हे बरोबरच केले. आधी त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे. शिवीगाळ व दमबाजी योग्य नाही. शिस्त पाळलीच पाहिजे, असे ते म्हणाले.

तसेच मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावर बोलताना, मराठी लोक गुजरात मध्ये जातात गुजराती बोलतात, तमिळनाडूमध्ये जातात तमिळ बोलतात तसे इथे राहणाऱ्या लोकांनी कामापुरते का होईना मराठी बोललेच पाहिजे. वाद करून काही होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. लाडकी बहीण योजने बाबत बोलतांना मंत्री भुजबळ म्हणाले, सरकार फार चांगल्या मनाने लोकांना, गरिबांना मदत व्हावी म्हणून एखादी योजना पुढे आणत असते. मात्र त्या योजनेचा बोजावरा उडता कामा नये. या योजनेत अनेक अटी असताना अनेकांनी लाभ उचलले. काही काही घरात चार चार महिलांनी लाभ उचलले. स्वाभाविक आहे, जे चुकीचं आहे ते पुढे येतं. मग ती चौकशी झाली पाहिजे. उद्धव ठाकरे यांच्या भेटींवर सुरू असलेल्या चर्चा फेटाळत, सार्वजनिक जीवनात कोणाही नेत्याला खुलेपणाने भेटता येते. लपून-छपून भेटण्याचे कारण नाही, असेही त्यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

Nashik TCS Case : निदा खानच्या अटकपुर्व जामिनाची सुनावणी ‘या’ तारखेला

0
नाशिकरोड |प्रतिनिधी| Nashik नाशिक येथील बहुचर्चित टीसीएस कंपनीत महिला सहकार्‍याच्या लैंगिक छळ आणि धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी या गुन्ह्यातील मुख्य संशयित निदा खान हिचा अटकपूर्व...