अहिल्यानगर | सचिन दसपुते | Ahilyanagar
जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गाजत असलेल्या ‘ग्रो मोअर’ आर्थिक घोटाळ्यात आता धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या आहेत. सर्वसामान्य गुंतवणूकदारांना शेअर मार्केटमध्ये मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रूपये उकळणार्या ‘ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिसेस प्रा. लि.’ कंपनीच्या संचालकांचे कारनामे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणात अटकेत असलेल्या दोन संशयितांविरूध्द नुकतेच राहाता न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल झाले आहे. दरम्यान, कंपनीने ‘सेबी’ची परवानगी नसतानाही ‘स्टॉक ब्रोकर’ असल्याचे भासवून गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलीस तपासानुसार, कंपनीने गुंतवणूकदारांकडून जमा केलेली रक्कम कंपनीच्या नावाने शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याऐवजी संचालकांच्या वैयक्तिक ‘डिमॅट’ खात्यांव्दारे व्यवहार केले. गुंतवणूकदारांना मिळणारा नफा किंवा मूळ गुंतवणूक परत देण्याऐवजी त्या पैशांतून महागडी वाहने, सोने आणि स्थावर मालमत्ता खरेदी करण्यात आली. या प्रकारामुळे हजारो गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रूपये अडकले आहेत.
तपासातून समोर आलेली सर्वात गंभीर बाब म्हणजे, ग्रो मोअर फिनकेअर सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीकडे स्टॉक ब्रोकर म्हणून काम करण्यासाठी आवश्यक असलेली सेबीची अधिकृत परवानगीच नव्हती. तरीही कंपनीच्या संचालकांनी स्वतःला अधिकृत मध्यस्थ असल्याचे सांगत सर्वसामान्य लोकांकडून गुंतवणूक गोळा केली. दरमहा 10 ते 15 टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर निधी उभारण्यात आला. सुरूवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देऊन विश्वास निर्माण करण्यात आला, मात्र काही कालावधीनंतर ना परतावा मिळाला ना गुंतवणुकीची रक्कम परत मिळाली. या घोटाळ्यात शिर्डी येथील साई बाबा संस्थानमध्ये कार्यरत असलेले संदीप भास्कर सावळे आणि सुबोध सुकदेव पाटील यांचा सहभाग उघड झाला असून ते अटकेत आहे. या दोघांविरूध्द राहाता न्यायालयात पुरवणी दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून मुख्य संशयित आरोपी भूपेंद्र सावळे याच्याविरूध्द यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल झाले आहे.
संदीप सावळे हा कंपनीचा संचालक असून सर्वसामान्य लोकांना गुंतवणुकीवर मोठा परतावा मिळेल असे सांगून कोट्यवधी रूपये गोळा करण्यात त्याची भूमिका असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. जमा झालेल्या रकमेतील काही भाग स्वतःच्या फायद्यासाठी वापरून महागडी वाहने, सोने तसेच इतर मालमत्ता खरेदी केल्याचेही तपासात समोर आले आहे. इतकेच नव्हे तर काही रक्कम एलआयसी पॉलिसीचे हप्ते भरण्यासाठीही वापरण्यात आली. या घोटाळ्यातील आणखी एक संशयित सुबोध पाटील हा कंपनीचा एजंट म्हणून काम करत होता. शिर्डी व राहाता परिसरात त्याने गुंतवणूकदारांना प्रत्यक्ष भेटून गुंतवणुकीचे आमिष दाखवले. तो साई बाबा संस्थानमध्ये नोकरी करत असताना सहकारी आणि परिचितांना कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी प्रवृत्त करत होता. या माध्यमातून शिर्डी व राहाता परिसरातून मोठ्या प्रमाणावर निधी जमा करण्यात आला.
तपासात कंपनीच्या बँक खात्यातून सुबोध पाटीलच्या वैयक्तिक खात्यावर मोठ्या प्रमाणावर रक्कम हस्तांतरित झाल्याचेही समोर आले आहे. गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवण्याऐवजी वैयक्तिक फायद्यासाठी वापरल्याचा आरोपही पोलीस तपासात स्पष्ट झाला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, शिर्डी, राहाता तसेच जिल्ह्यातील सुमारे चार हजार लोकांनी या कंपनीत गुंतवणूक केली होती. दरमहा मोठा परतावा मिळेल या आशेने अनेकांनी लाखो रूपये गुंतवले. मात्र काही काळानंतर परतावा बंद झाल्याने फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. यानंतर शिर्डी, राहाता पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल झाले. नंदूरबार जिल्ह्यात देखील गुन्हा दाखल आहे.
5.50 कोटींचा ‘एमपीआयडी’ प्रस्ताव
या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे करत आहेत. आतापर्यंत तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान संशयित आरोपींशी संबंधित 39 बँक खाती गोठवण्यात आली आहेत. तसेच संशयित आरोपींच्या मालमत्तेची माहिती गोळा करून सुमारे पाच कोटी 50 लाख रूपयांचा‘ एमपीआयडी’ प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणातील ‘मनीट्रेल’चा अंतिम अहवाल अद्याप प्रलंबित आहे.
गुंतवणूकदारच उदासीन
या प्रकरणातील आणखी एक आश्चर्यकारक बाब म्हणजे हजारो गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असतानाही फार कमी लोकांनी पुढे येऊन पोलिसांना जबाब दिले आहेत. सुमारे चार हजार गुंतवणूकदारांपैकी केवळ 250 जणांनीच आतापर्यंत आपले जबाब नोंदवले आहेत. पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही गुंतवणूकदार पुढे येत नसल्याने तपास प्रक्रियेला अडथळा निर्माण होत असल्याचेही दिसून येत आहे.
नातेवाईकही पोलिसांच्या रडारवर
या घोटाळ्यातील तिघांना अटक करण्यात आली असली तरी पाच संशयित आरोपी अद्याप पसार आहेत. तपास यंत्रणांनी आता या संशयित आरोपींच्या नातेवाईकांच्या आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू केला आहे. मनीट्रेलमधून त्यांच्या बँक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळल्यास या प्रकरणात आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, ‘ग्रो मोअर’ घोटाळ्याच्या तपासात अजूनही अनेक आर्थिक धागेदोरे उलगडण्याची शक्यता असून अंतिम मनीट्रेल अहवाल आल्यानंतर या आर्थिक घोटाळ्याचे खरे स्वरूप आणि त्यामागील जाळे आणखी मोठ्या प्रमाणावर उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




