राहाता |प्रतिनिधी| Rahata
ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून वाढलेले चोर्यांचे प्रमाण आणि रात्रीच्या वेळी अज्ञात व्यक्तींकडून निर्माण केली जाणारी दहशत या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस प्रशासनाला कडक शब्दांत सुनावले आहे. पोलीस प्रशासनाचे अपयश चव्हाट्यावर येत असून नागरी जीवन भयग्रस्त झाले आहे, हे खपवून घेतले जाणार नाही. गुन्हेगारांचा वेळीच बंदोबस्त करा आणि नागरिकांमधील भीती घालवण्यासाठी तातडीने उपाययोजना करा, अशा सूचना त्यांनी दिल्या आहेत.
राहुरी, राहाता, श्रीरामपूर आणि संगमनेर तालुक्यांत रात्रीच्या वेळी अवैधरित्या ड्रोन फिरवणे आणि लोकांमध्ये घबराट निर्माण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ना. विखे पाटील यांनी तिन्ही तालुक्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकार्यांची तातडीची बैठक घेतली. गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या या घटनांमुळे प्रशासनाबद्दल नकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सरकार तुमच्या पाठीशी खंबीर आहे, मात्र अवैध व्यवसाय करणारे आणि दहशत पसरवणारे कोणाचेही असोत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे स्पष्ट आदेश त्यांनी यावेळी दिले.
अपुर्या मनुष्यबळाचे कारण न देता जिल्हा प्रशासनाकडून अधिकची कुमक मागवून घेण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. दिवसा आणि रात्री ग्रामीण भागात गस्त सुरू ठेवावी, तसेच संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाच्या अत्याधुनिक यंत्रणेची मदत घेण्याचेही त्यांनी सुचवले. जिल्हा नियोजन समितीमार्फत सीसीटीव्ही आणि नवीन वाहने उपलब्ध करून दिली असून संरक्षणासाठी अधिक निधी देण्याची तयारीही पालकमंत्र्यांनी दर्शवली आहे. स्थानिक पातळीवर ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन प्रत्येक गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारी हॉटेल्स आणि पान स्टॉल्सवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याचे आदेश त्यांनी पोलीस प्रशासनाला दिले.
जिल्ह्यात गर्भलिंग तपासणीचे रॅकेट उघड केल्याबद्दल मी पोलिसांचे अभिनंदन करतो. मात्र, अशा प्रकारच्या तक्रारी पूर्णपणे बंद करण्याचे मोठे आव्हान तुमच्यासमोर आहे. अशा गंभीर गुन्ह्यांत किंवा दहशतीच्या प्रकारांत सहभागी असलेल्या कोणत्याही व्यक्तीला पाठीशी घालू नका, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करा.
– ना. राधाकृष्ण विखे पाटील (पालकमंत्री)




