शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
उत्तराखंडातील देवभूमी प्रमाणेच संतांची भूमी म्हणून अहिल्यानगरच्या भूमिची ओळख व्हावी असा आपला प्रयत्न आहे. यासाठी जिल्ह्याचा तिर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून कामही सुरू झाले आहे. जिल्ह्याचा आध्यात्मिक कॉरीडॉर तयार करून रोजगाराची इको सिस्टीम तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे प्रतिपादन महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शहरातील समर्थ प्रतिष्ठानने गणेशोत्सवानिमित्त सादर केलेल्या केदारनाथ धाम मंदिराच्या देखाव्यांचे उद्घाटन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच नगरपरिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कर मुल्यांकनास स्थगिती मिळवून दिल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कारही करण्यात आला. सामाजिक कार्यात योगदान देणार्या व्यक्ती आणि संस्थांनाही मंत्री विखे पाटील यांच्याहस्ते गौरविण्यात आले.
मंत्री विखे पाटील म्हणाले, समर्थ प्रतिष्ठानचे निलेश कोते यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. गणेश उत्सवातून जपलेल्या धार्मिक परंपरेचा गौरवपूर्ण उल्लेख करून लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव साजरा करणारे अनेक गणेश मंडळ सामाजिक दायित्वाने चांगले काम करीत असल्याचे सांगितले. विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंड मधील देवाच्या भूमीचा जसा कॉरिडॉर तयार केला. यातून या भागातील पर्यटनाला नव्या संधी मिळाल्या. त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊनच अहिल्यानगरची भूमी संतांची भूमी म्हणून अधिक ठळकपणे ओळखली जावी यासाठी आपण काम सुरू केले. याची सुरुवात श्रीक्षेत्र नेवासे येथून केली आहे. ज्ञानेश्वर सृष्टीच्या उभारणीसाठी 350 कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक आध्यात्मिक स्थान आणि संतांचे अधिष्ठान आहे. याचे महत्त्व लक्षात घेऊन ही सर्व तिर्थस्थाने विकास प्रक्रीयेशी जोडण्याचा आपला प्रयत्न आहे. अहिल्यानगर जिल्हा आध्यात्मिक कॉरीडॉर म्हणून भविष्यात ओळखला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे उभारले जाणारे राष्ट्रीय स्मारक हे महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारे ठरले. या माध्यमातूनही जिल्ह्याचे पर्यटन आणि रोजगार निर्माणाची इको सिस्टीम तयार करण्याचे नियोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले. शिर्डी शहराचे पावित्र्य राखण्याचे दायित्व सर्वांचेच आहे. शहरात अवैध धंद्यांना पाठबळ मिळणे उचित नाही.
या परिसरातील जागा, हॉटेल याचा रोजरोसपणे वापर अवैध धंद्यासाठी होणे म्हणजे या भूमीची बदनामी होण्यासारखी आहे. अशा अवैध धंद्यांना कोणीही पाठीशी घालू नका, असे अवाहन करतानाच या अवैध व्यवसायातील प्रवृत्ती आज गावापर्यंत आल्या आहेत. उद्या घरापर्यंत आल्यानंतर काय होईल याचा गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. या विरोधात जे-जे करावे लागेल त्यासाठी मी तुमच्या बरोबर आहे, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली. यावेळी माजी नगराध्यक्ष कैलास कोते, अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, आप्पासाहेब कोते, संदीप सोनवणे, बाबासाहेब कोते, गोपीनाथ गोंदकर, मधुकर कोते, विलास कोते, अॅड. अनिल शेजवळ, रमेश गोंदकर, ताराचंद कोते, विनायक कोते यांच्यासह कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
मंत्री विखे पाटील यांनी शहरातील जैन स्थानकात जाऊन पर्युषण पर्वाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. या पवित्र पर्वाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना भेटण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य समजतो, असे सांगून मुंबई येथे जैन समाजाच्या शैक्षणिक आणि वैद्यकीय प्रकल्पासाठी महसूल विभागाच्या माध्यमातून जागेची उपलब्धता करून दिली असल्याची माहिती त्यांनी संवाद साधताना दिली.