बेलापूर |वार्ताहर| Belapur
श्रीरामपूरच्या नेत्यांनी पाणी प्रश्नाचे फक्त राजकारण करुन राजकीय पोळी भाजली. एमआयडीसीच्या विकासासाठी काहीही केले नाही. आम्ही मात्र श्रीरामपूरसह अहिल्यानगर जिल्हा हा उद्योग व कारखानदारीचे केंद्र बनावे यासाठी प्रयत्नशील आहोत, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
बेलापूर बुद्रूक ग्रामपंचायतीच्या मार्फत विविध विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी बोलताना ना. विखे पाटील पुढे म्हणाले, मी पालकमंत्री झाल्यापासून श्रीरामपूरला पाण्याची समस्या येवू दिली नाही. श्रीरामपूरसह बेलापूरपर्यंतचा कालवा बंदिस्त केला जाणार असल्याने शुध्द पाणीपुरवठा होईल. प्रवरा नदीतील बंधारे वर्षातून दोनवेळा भरून दिले जातात. तसेच शेतीसाठीही पाटपाण्याचे योग्य नियोजन केले जाते. यामुळे पाणी प्रश्नावर राजकारण करणारांचे पितळ उघडे झाले आहे.
ज्यांनी चाळीस वर्ष आमदारकीसह विविध सत्ता भोगल्या त्यांनी श्रीरामपूर तालुक्याच्या विकासासाठी काय केले? तसेच श्रीरामपूरची एमआयडीसी विकसित का झाली नाही? याचा जाब त्यांना विचारावा. आम्ही खंडकरी शेतकर्यांचा प्रश्न मार्गी लावला तसेच आकारी पडीतांचाही प्रश्न सुटेल, असा विश्वासही ना. विखे यांनी व्यक्त केला. यावेळी जिल्हा परिषद माजी सदस्य शरद नवले, बाजार समितीचे माजी उपसभापती अभिषेक खंडागळे, सरपंच मीनाताई साळवी, उपसरपंच चंद्रकांत नवले यांच्यासह विविध मान्यवर, सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.
घरकुलात अडथळे आणणार्यांचा बंदोबस्त करू – ना. विखे पाटील
बेलापूर-ऐनतपूर घरकूल योजना शासनाची आहे. त्यासाठी शासनाने मोफत जमीन दिली आहे. असे असताना रस्ते किती मीटरचे असावे? रेखांकनानुसार ले आऊट असावे? या भानगडीपेक्षा गोरगरिबांना घरे मिळावे याला महत्व द्यावे. पालकमंत्री म्हणून घरकूल वसाहत पूर्ण करणे माझी जबाबदारी असून ती पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. याऊपर यात अडथळे आणल्यास त्याचा बंदोबस्त केला जाईल. सर्वांना बरोबर घेवून बेरजेचे राजकारण करायचे आहे. जे सोबत येतील त्यांना बरोबर घेवू. पण ते आले की जे बरोबर आहेत ते जातात, अशी मिश्किल टिप्पणीही ना. विखे पाटील यांनी केली.





