अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
महानगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पूर्ण होऊन 68 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यानंतर महापौर व उपमहापौर पदासाठी निवडणूक होऊन नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांनी पदभार स्वीकारला आहे. आता राज्य शासनाच्या निर्देशानुसार महानगरपालिकेच्या पहिल्या सर्वसाधारण सभेत सहा स्वीकृत (नामनिर्देशित) सदस्यांची निवड केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली आहे.
राजकीय पक्षांच्या बलाबलानुसार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे तीन, भाजपाचे दोन तर शिवसेनेचा एक सदस्य स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्त केला जाणार आहे. याबाबत शासनाच्या अध्यादेशानुसार केवळ पात्रता पूर्ण करणार्या व्यक्तींचीच शिफारस संबंधित राजकीय पक्षांच्या गटनेत्यांना करावी लागणार आहे. संबंधित राजकीय पक्षाचा गटनेता पात्र उमेदवारांची शिफारस आयुक्तांकडे सादर करणार असून, आयुक्तांच्या छाननीनंतर महापौरांच्या उपस्थितीत होणार्या पहिल्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत सदस्यांची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
नामनिर्देशित (स्वीकृत) सदस्यांबाबत महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्तीची कार्यपध्दती) नियम, 2010 मधील नियम 4 (छ) नुसार स्पष्ट तरतूद आहे. त्यानुसार महानगरपालिका किंवा नगरपरिषद क्षेत्रात कार्यरत असलेल्या व समाजकल्याण कार्यात गुंतलेल्या मुंबई सार्वजनिक विश्वस्त संस्था अधिनियम, 1950 अंतर्गत नोंदणीकृत समाजाधिष्ठित अशासकीय संघटनेचा पदाधिकारी म्हणून किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच संबंधित व्यक्तीस धर्मादाय आयुक्तांनी अधिकृत मान्यता दिल्यापासूनच हा अनुभव ग्राह्य धरला जाणार असल्याचे आयुक्त डांगे यांनी स्पष्ट केले आहे. कोणत्याही व्यक्तीला थेट किंवा संस्थेमार्फत स्वतःच्या नावाची शिफारस करता येणार नाही. केवळ संबंधित राजकीय पक्षांच्या गटनेत्यांनाच स्वीकृत सदस्य पदासाठी नावांची शिफारस करण्याचा अधिकार असून, या प्रक्रियेत नियमांचे काटेकोर पालन केले जाईल, असेही डांगे यांनी स्पष्ट केले.
काय आहे पात्रता?
स्वीकृत सदस्य म्हणून नियुक्तीसाठी राज्यात नोंदणीकृत असलेला डॉक्टर, मान्यताप्राप्त शाळा किंवा महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक, व्याख्याता अथवा मुख्याध्यापक, सनदी लेखापाल (सीए), पदवीधारक अभियंता, वकील, महानगरपालिका किंवा नगरपरिषदेत मुख्य अधिकारी, सहायक आयुक्त किंवा उपायुक्त म्हणून काम केलेला निवृत्त अधिकारी तसेच नोंदणीकृत सामाजिक संस्थेचा पदाधिकारी अशा घटकांपैकी एका घटकात किमान पाच वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.





