अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीत नगर जिल्हा राज्यात अग्रेसर आहे. नागरिकांना गुणवत्तापूर्ण, अधिक गतीमान व सुलभरितीने सेवा देत जिल्हा देशासाठी दिशादर्शक ठरावा यासाठी अधिकारी, कर्मचार्यांनी एकत्रितपणे काम करण्याच्या सूचना सहकार, पणन व वस्द्योत्रोग विभागाचे प्रधान सचिव तथा जिल्ह्याचे पालक सचिव प्रविण दराडे यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात 100 दिवस कृती आराखड्याबाबत आयोजित आढावा बैठकीमध्ये पालकसचिव दराडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिकेचे आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी उपस्थित होते. पालकसचिव दराडे म्हणाले, मुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण राज्यभरामध्ये 100 दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत आहे.
आराखड्यानुसार जिल्ह्यात समाधानकारक काम करण्यात येत असले तरी यापेक्षा अधिक उत्तम काम करण्याची जिल्ह्यातील अधिकार्यांमध्ये क्षमता आहे. बदल हीच कायमस्वरुपी बाब असल्याने प्रत्येक अधिकारी, कर्मचार्यांनी होणार्या नवनवीन बदलांचा स्वीकार करत नाविन्यपूर्ण व कल्पकतेमधून उपक्रम राबवून आपले कार्यालय व जिल्हा आदर्श होईल, यादृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.जिल्ह्यातील नागरिकांचे प्रश्न त्यांच्या जिल्ह्यातच सुटावेत त्यांना मंत्रालयात येण्याची गरज भासू नये या बाबींवर मुख्यमंत्र्यांचा भर आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी नेमण्यात आलेल्या पालक अधिकार्यांनी तालुकास्तरावर ग्रामीण व तालुकापातळीवरील अधिकार्यांना सहभागी करुन घेत नागरिकांच्या बैठका घ्याव्यात. या बैठकांमधून त्यांच्या प्रश्नांची जागेवर सोडवणूक कशी करता येईल, यावर अधिक भर देण्यात यावा.
जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी सादरीकरणाद्वारे जिल्हा प्रशासनाच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यात नागरिकांचे जीवनमान सुकर होण्यासाठी 1 लाख दाखले वाटप, 300 शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करणे, दरखास्त ताबा प्रकरणे निकाली काढणे तसेच अभिनव उपक्रमांमध्ये सेवादूत, जलदूत, जीवन प्रमाणम, एआय चॅटबोट, ई-प्रकल्प आदींचा समावेश होता. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्यासह विभाग प्रमुखांनी 100 दिवस कृती आराखड्याच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कामांची माहिती पॉवर प्रेंझेंटेशनच्या माध्यमातून दिली.
कॉपीमुक्तीसाठी वॉररूमसारखे उपक्रम उपयुक्त
जिल्ह्यात इयत्ता बारावीची परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात, यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या वॉररुमला पालकसचिव दराडे यांनी भेट देऊन पाहणी केली. वॉररुमसारखे उपक्रम कॉपीमुक्तीसाठी उपयुक्त असल्याचेही ते यावेळी म्हणाले.