अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
‘गुलीयन बॅरी सिंड्रोम’ च्या नावाच्या आजाराने पुण्यात अनेक बाधित झाले आहेत. नगर शहरात अथवा जिल्ह्यात या आजारचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र, नगरहून पुणे आणि पुण्यावरून नगरला येणार्या व जाणार्यांची संख्या मोठी असल्याने या आजाराबाबत दक्षता घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत. यामुळे ‘गुलीयन बॅरी सिंड्रोम’ (जीबीएस) ची नगरमध्ये दहशथ असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक नागनाथ चव्हाण व मनपा आयुक्त यशवंत डांगे यांनी याबाबत मंगळवारी शासकीय आणि खासगी आरोग्य संस्थांना याबाबत दिल्या आहेत. यात नगर शहर वा ग्रामीण भागात या आजाराचे अथवा सदृष्य लक्षणे असणार्या संशयित रुग्णाची माहिती त्वरित आरोग्य विभागाला कळवावी, सांगण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात व पिंपरी चिंचवड शहरात गुलीयन बॅरी सिंड्रोम आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. हा संसर्गजन्य आजार नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. नगर शहरातून दररोज पुण्याला जाणार्या व येणार्या नागरिकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे याबाबत काळजी घेणे गरजेचे आहे.
आरोग्य विभागाकडून नगर शहरातील सातही आरोग्य केंद्रांच्या वैद्यकीय अधिकार्यांना बैठक घरून दक्ष राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच, शहरातील खासगी रुग्णालये व वैद्यकीय संघटनांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. या आजाराची लक्षणे असलेली रुग्ण आढळल्यास जिल्हा शासकीय रुग्णालय अथवा महापालिकेच्या आरोग्य विभागाला कळवण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य केंद्रांच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात अशा लक्षणांची रुग्ण आढळल्यास संपर्क साधण्यास सांगितले असल्याचे मनपा आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. सतिष राजूरकर यांनी सांगितले. दरम्यान, नगर शहरातील विविध भागातील पाण्याचे नमुने घेऊन ते तपासणीसाठी जिल्हा प्रयोगशाळेकडे पाठवण्यात येणार आहे, असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.