धरणगाव – प्रतिनिधी
राज्याचा मंत्रीमंडळ विस्तार रखडला आहे. अशातच आ.गुलाबराव पाटील यांच्या मंत्रीमंडळातील समावेशाला स्वकियांकडूनच विरोध होत असल्याचे वृत्त माध्यमातून प्रसारित होत आहे. आपला लाडका नेता आ.गुलाबभाऊ विषयीच संभ्रम निर्माण केला जात असल्याचे पाहून जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता पसरून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज बुधवारी दुपारनंतर माजी मंत्री अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, तानाजी सावंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्यासह काही जेष्ठ आमदारांच्या मंत्रीमंडळातील समावेशाला शिवसेनेचेच आमदार विरोध करीत असल्याचे वृत्त एका वृत्तवाहिनीवरून प्रसारित करण्यात आले.
या वृत्ताचे पडसाद संपूर्ण खान्देशातील शिवसैनिकांमध्ये उमटू लागले आहेत. गुलाबराव पाटील म्हणजे खान्देशातील शिवसैनिकांचे उर्जास्त्रोत आहे. १९९१ पासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत गुलाबराव पाटील यांनी शिवसेना आणि शिवसैनिकांना ताकद देण्यासाठी रक्ताच पाणी केलं. १९९९ मध्ये जळगावसह संपूर्ण खान्देशातील एकमेव आमदार म्हणून त्यांनी विजय संपादन केला. यानंतर घरावर तुळशीपत्र ठेवले. कुटुंबाचा विचार न करता गुलाबराव पाटील यांनी दिवसरात्र मेहनत करून शिवसैनिकांची फळी उभी केली. याचाच परिपाक म्हणून २००४ मध्ये झालेल्या निवडणुकीत एकट्या जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे चार आमदार विजयी झाले.
आक्रमक भाषण शैली आणि अर्ध्या रात्री सुखदुःखात धावून येणारा हक्काचा माणूस म्हणून शिवसैनिकांमध्ये गेल्या तीन दशकांपासून गुलाबराव पाटील यांची ‘भाऊ’ ही प्रतिमा लोकप्रिय आहे. शिवसैनिकांची कोणतीही समस्या असो ती सुटल्याशिवाय गुलाबराव पाटील यांना चैन पडत नाही. मंत्रीमंडळात समावेश झाल्यानंतरही शिवसैनिकांसोबतची त्यांची नाड आजही जुडलेली. याचा परिपाक म्हणूनच यंदाच्या निवडणुकीत विक्रमी मताधिक्याने गुलाबराव पाटील यांचा विजय झाला. गुलाबभाऊ यांनी जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतांना संपूर्ण जिल्ह्यात विकास निधीचे वितरण करतांना कुठेही दुजाभाव केला नाही.
कोट्यवधींचा निधी प्रत्येक मतदारसंघात वितरीत करून महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्ता समाधानी कसा राहील याची वैयक्तिक काळजी गुलाबभाऊ घेत होते. याचा सकारात्मक परिणाम जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण खान्देशात विरोधकांचा सुपडा साफ होवून महायुतीच्या वाट्याला शतप्रतिशत यश प्राप्त झाले आहे. या विजयाचा उत्सवही अजून साजरा केला नसतांनाच भाऊंच्या मंत्रीमंडळातील समावेशा विषयी शंका उपस्थित करण्यात आलेल्या वृत्तामुळे शिवसैनिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मंत्रीपद मिळावं असं वाटण्यात गैर काहीच नाही. गुलाबराव पाटील यांच्या शब्दाला शिवसेनेत मोठी किंमत आहे. त्यांच्या नेतृत्वात शिवसेनेला जिल्ह्यात मिळालेलं यशही प्रचंड आहे. अशा परिस्थितीत गुलाबभाऊंसह आणखी एक मंत्रीपद जास्तीचे मिळू शकते. या जास्तीच्या मंत्रीपदासाठी गुलाबराव पाटील यांना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करण्यास सांगितले तर ते सहज शक्य आहे. असे झालेच तर शिवसैनिकांचा आनंद व्दिगुणित होईल.
मात्र, गुलाबभाऊं शिवाय राज्याचं मंत्रीमंडळाची कल्पनाही आपण करू शकत नाही अशा तीव्र भावना शिवसैनिक व्यक्त करीत आहेत. गुलाबभाऊंना डावलून मंत्रीपद मिळावे अशी अपेक्षा शिवसेनेचे कुठलेच आमदार व्यक्त करू शकत नाही. वृत्तवाहिन्यांमधून प्रसारित केले जाणारे वृत्त हे खोडसाळपणाचे आहे. मंत्रीमंडळ विस्तारात गुलाबभाऊ शिवसैनिकांचे प्रतिनिधी म्हणून शपथ घेतीलच असा निर्धारही शिवसैनिक व्यक्त करीत आहेत.