Friday, May 3, 2024
Homeनंदुरबारनवापूर येथे दीड लाखाचा गुटखा जप्त

नवापूर येथे दीड लाखाचा गुटखा जप्त

नवापूर | श.प्र.- NAVAPUR

येथील पोलीस विभागाने काल मध्यरात्री कारवाई करत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला दीड लाखाच्या गुटख्यासह ८ लाख ५९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांविरुद्ध नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात राज्यातून महाराष्ट्रात नवापूरमार्गे राज्यात प्रतिबंधित असलेल्या विमल गुटख्याची वाहतूक एमएच०४ बीएन २९२३ या क्रमांकाच्या गाडीने होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन नवापूर पोलिसांनी रात्रीच्या गस्तीच्या वेळेस सापळा रचला.

नवापूर शहरातील धडधडया रेल्वेगेटजवळ गुजरात राज्यातून नवापूर शहराच्या दिशेने काळ्या रंगाची स्कॉर्पिओ येत असतांना थांबवले. चालकास विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिले. त्यामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी संपूर्ण वाहन तपासले असता वाहनातून महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला विमल गुटखा आढळून आला.

सदर वाहन पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. त्यात १ लाख २० हजार रुपयाचे २६०० विमल पाऊच, तीस हजार रुपये किमतीचे २५०० तंबाखू पाऊच जप्त केले आहे. सदर कारवाईत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आणि १ लाख ५३ हजार रुपये किमतीचा विमल गुटखा असा एकूण आठ लाख ५९ हजार ३५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

याप्रकरणी झुलफेकर सय्यद (वय ३३), तौसिफ कदर शेख (वय ३२), अमित अग्रवाल (सर्व रा.नवापूर) यांच्याविरोधात नवापूर पोलिसात भादवि कलम ३२८ १८८ २७२ २७३ ३४ सह अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २६ (२ ) (४ ) ३० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक विजय पवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अशोक मोकळ, पोलीस शिपाई पंकज सूर्यवंशी, विकी वाघ, जगदीश सोनवणे यांच्या पथकाने केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या