शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजा विक्री साहित्याच्या दुकानात हरतालिकाच्या पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदाम सापडल्याने एकच खळबळ उडाली असून साहित्य विक्री करणार्या विक्रेत्यावर शिर्डी नगरपरिषदेने कारवाई केली आहे. नगरपरिषदेचा कर्मचारी पूजेचे साहित्य घेण्यासाठी गेला असता त्या कर्मचार्यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. कर्मचार्यांनी तात्काळ वरिष्ठांना या प्रकाराची माहिती दिली. अतिक्रमण विभाग आणि सुरक्षा बल विभागाच्या कर्मचार्यांनी बनावट पूजेचे साहित्य विक्री करणार्या व्यवसायिकांना ताब्यात घेतले.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर शिर्डी नगरपरिषद प्रशासनाने शिर्डी शहरामध्ये थाटलेल्या पूजेचे साहित्य विक्री करणार्या दुकानांची तपासणी सुरू केली. त्यात बनावट प्लास्टिक बदाम विक्री करणार्या व्यवसायिकावर शिर्डी नगरपरिषदेने दंडात्मक कारवाई केल्याचे समजते. परंतु शिर्डी पोलिसात या घटनेबाबत रात्री उशिरापर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नव्हता. याआधी प्लास्टिक तांदूळ तसेच विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळयुक्त रासायनिक द्रव्य टाकण्याचा प्रकार अनेकदा उघडकीस आला आहे.
राज्यात विविध खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करणार्या नागरिकांवर मोठ्या स्वरूपाची कारवाई करण्याची धडक मोहीम तुकाराम मुंडे यांनी हाती घेतल्यानंतर राज्यात दूध भेसळ करणार्या दूध डे़अरीमध्ये देखील दुधाची आवक कमी झाल्याचे दिसून आले. याचा अर्थ दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबरोबरच सर्रास प्लास्टिक तांदूळ वापर होत असल्याचे देखील निदर्शनास आले होते. याबरोबरच खतांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिर्डीत हरतालिकेच्या पूजेच्या साहित्यात चक्क प्लास्टिकचे बदामांची विक्री होत असल्याचे दिसून आल्याने सोमवारी नागरिकांमध्ये या गोष्टीची जोरदार चर्चा सुरू झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या प्रकाराची जोरदार चर्चा झाली. सदरचे प्लास्टिक बदाम हे कोणाकडून विकत घेतले ते प्लास्टिकचे बदाम विकण्या मागचा नेमका काय उद्देश होता. याबाबत पोलिसांनी तपास करणे आवश्यक असल्याचे नागरिकांमधून बोलले जात आहे.




