Tuesday, November 17, 2026
Homeक्राईमAhilyanagar : आरोग्यपूरक उत्पादनांचा 55 हजारांचा साठा जप्त

Ahilyanagar : आरोग्यपूरक उत्पादनांचा 55 हजारांचा साठा जप्त

अन्न व औषध प्रशासनाची अहिल्यानगर शहरात कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अन्न व औषध प्रशासनाने अहिल्यानगर शहरातील बुरूडगल्ली येथील गुंडेचा एजन्सीवर छापा टाकून संशयास्पद आरोग्यपूरक उत्पादनांचा (न्यूट्रास्युटिकल्स- हेल्थ सप्लिमेंट्स) 55 हजार 517 रूपये किमतीचा साठा जप्त केला. या कारवाईत ‘अल्टिब्रेन-एस’ आणि ‘रेजुव्हान्स’ या दोन उत्पादनांचा समावेश आहे. संबंधित उत्पादने निकृष्ट दर्जाची किंवा असुरक्षित असण्याची शक्यता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली.

- Advertisement -

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक विभागाचे सहआयुक्त माने आणि येथील अन्न विभागाचे सहाय्यक आयुक्त गौरव जगताप यांच्या सूचनेनुसार 13 नोव्हेंबर रोजी ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांनी ही कारवाई केली. गुंडेचा एजन्सी येथून ‘अल्टिब्रेन-एस’ या आरोग्यपूरक उत्पादनाच्या चार स्ट्रिप पॅकेट्सचा साठा जप्त करण्यात आला. त्याची किंमत एक हजार 996 रूपये आहे.

तसेच ‘रेजुव्हान्स’ या उत्पादनाची 179 स्ट्रिप पॅकेट्स जप्त करण्यात आली असून, त्यांची किंमत 53 हजार 521 रूपये आहे. अशा प्रकारे एकूण 55 हजार 517 रूपये किमतीचा साठा प्रशासनाने ताब्यात घेतला. ही उत्पादने अन्न सुरक्षा व मानके नियमावली 2016 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारी असल्याचा संशय आहे. तसेच भारतीय अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या प्रतिबंधात्मक आदेशाच्या अनुषंगानेही ही कारवाई करण्यात आली.

पुण्यातील पुरवठादाराचीही चौकशी
जप्त करण्यात आलेली हीच उत्पादने पुणे येथील मे. कांचन फार्मा या पुरवठादाराकडून बिलाव्दारे आणण्यात आल्याची माहिती तपासात समोर आली आहे. पुण्यातील पुरवठा साखळीच्या अनुषंगाने पुढील कारवाई केली जाणार आहे. या प्रकरणाचा तपास अन्न सुरक्षा अधिकारी किरण जगदाळे यांच्याकडे सोपविण्यात आला असून, संबंधित उत्पादनांचा पुरवठा, वितरण आणि विक्री याबाबत चौकशी केली जाणार आहे. तसेच नियमांनुसार उत्पादन परत मागविण्याची (रिकॉल) प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

Shrirampur : भोकर फाट्यावरील कृषी गोदाम फोडून लाखांची चोरी

0
भोकर |वार्ताहर| Bhokar श्रीरामपूर तालुक्यातील भोकर शिवारामध्ये श्रीरामपूर-नेवासा राज्यमार्गावर एका कृषी उद्योग गोदामाचे अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री शटर उचकटून सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लांबवल्याची घटना घडली...