मुंबई | Mumbai
राज्यासाठी कालचा रविवारचा दिवस अत्यंत उष्णतेचा ठरला आहे. कारण राज्यातील अनेक शहरांमध्ये सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद करण्यात आली आहे. दिवसागणिक तापमानाच्या पाऱ्यात वाढ होत असल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अशातच विदर्भातील अकोल्यात काल (रविवारी) तापमानाचा पारा तब्बल 46.9 अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. त्या पाठोपाठ अमरावती (४६.८), वर्धा (४६.४), यवतमाळ (४६) आणि नागपूर (४५.४) यांचा क्रमांक लागला. विशेष म्हणजे अकोल हे जगातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत वरच्या क्रमांकावर पोहोचले आहे.
रविवारी देशातील सर्वात उष्ण १६ शहरांमध्ये महाराष्ट्रातील सहा शहरांचा समावेश झाला आहे. ही सर्व विदर्भ विभागातील आहे. अकोला ४६.९ अंश सेल्सिअससह सर्वात उष्ण होते, तर पुणे, सोलापूर आणि नाशिकमध्ये पारा ४० अंशांच्या पार गेला होता.
पुढील तीन दिवस उष्णतेचे
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (२७ एप्रिल) राज्यातील अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेची शक्यता असल्याने दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच, बुलढाणा, नागपूर, वाशिम, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्येही सतर्कतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. उर्वरित राज्यात ढगाळ वातावरण राहण्याची तसेच उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
हवामान खात्याचा इशारा
याआधीच भारतीय हवामान खात्याने राज्यात उष्णतेच्या लाटेचा हायअलर्ट जारी केला होता. उन्हाच्या कडाक्याचा दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम होताना दिसत आहे. शहरात ऐन दुपारी अघोषित संचारबंदी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. रस्ते आणि बाजारपेठेत शुकशुकाट दिसत आहे. दरम्यान, नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय दुपारी 12 ते 4 या वेळेत बाहेर पडू नये. बाहेर पडताना डोक्यावर टोपी, रुमाल किंवा गॉगल वापरणे, तसेच पाण्याची बाटली सोबत ठेवणे आवश्यक असल्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
देशातील ही शहरे सर्वाधिक हॉट
संपूर्ण भारत सध्या कडाक्याच्या उन्हाने होरपळून निघत आहे. वायव्य आणि मध्य भारतात उष्णतेच्या लाटेने कहर केला असून नागरिक हैराण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामान विभागाने हिमाचल प्रदेश, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भात पुढील तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट कायम राहील, अशी शक्यता व्यक्त केली आहे.
वायव्य भारतात २९ आणि ३० एप्रिल रोजी तापमानात ३ ते ५ अंश सेल्सिअसने घट होऊ शकते. तर, मध्य भारतात २८ ते ३० एप्रिल दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याची शक्यता असल्याने तापमान २ ते ३ अंशांनी खाली येईल, अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात १ मे पर्यंत तापमानाचा पारा २ ते ३ अंशांनी घसरण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मे महिन्याची सुरुवात काहीशी सुसह्य ठरेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




