
नाशिक | प्रतिनिधी Nashik
जिल्ह्यातील जनसामान्यांच्या मनात गेल्या पाच दशकांहून अधिक काळ अढळ स्थान निर्माण करणार्या दैनिक ‘देशदूत’चा ५७ वा वर्धापन दिन आज शुक्रवारी (दि. ४) साजरा होणार आहे. यानिमित्ताने व्याख्यान आणि स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दैनिक ‘देशदूत’ने आपल्या वाटचालीत समाजप्रबोधनाची परंपरा जपत सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच सार्वजनिक जीवनातील विविध घडामोडींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडताना समाजहिताच्या विविध विषयांवर भूमिका मांडणार्या ‘देशदूत’च्या या प्रदीर्घ प्रवासातील ५७ वे वर्ष महत्त्वपूर्ण ठरणार आहे. वर्धापन दिनानिमित्त राजयोग शिक्षक, आंतरराष्ट्रीय मोटिव्हेशनल स्पीकर, कॉर्पोरेट ट्रेनर, समुपदेशक राजयोगी ब्रह्माकुमार गिरीश भाईजी (मुंबई) यांचे विशेष व्याख्यान दुपारी चार ते सायंकाळी सहादरम्यान कॉलेजरोड येथील गुरुदक्षिणा सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.‘खुशी का पासवर्ड’ या विषयावर ते उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. धावपळीचे जीवन, वाढता ताण, बदलती जीवनशैली आणि त्यातून निर्माण होणारी अस्वस्थता या पार्श्वभूमीवर आनंदी व सकारात्मक जीवनाचा दृष्टिकोन या व्याख्यानातून उलगडण्याची अपेक्षा आहे.
दैनिक ‘देशदूत’च्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमानंतर स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ‘देशदूत’शी गेल्या अनेक वर्षांपासून जोडलेले वाचक, जाहिरातदार, हितचिंतक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, विविध संस्थांचे प्रतिनिधी आणि मित्र परिवार यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘देशदूत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.
नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींचा साक्षीदार राहण्याबरोबरच विविध क्षेत्रातील व्यक्ती, संस्था आणि उपक्रमांना प्रसिद्धीचे व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे वर्धापनदिनाचा हा सोहळा ‘देशदूत’ परिवारासाठी तसेच त्याच्याशी जिव्हाळ्याचे नाते असलेल्या वाचकांसाठी विशेष ठरणार आहे.
असा होणार कार्यक्रम
दै.’देशदूत’ वर्धापनदिनाचा आज ४ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे.चार ते सहा गिरीशभाईजी यांचे व्याख्यान व सायंकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत स्नेहमिलन सोहळा होणार आहे. शिल्पकार विकासाचा ही भूमिका जपत गेल्या ५७ वर्षांत ‘देशदूत’ने केलेल्या वाटचालीचा उत्सव आणि वाचकांशी असलेल्या ऋणानुबंधाचा आनंद साजरा करणारा हा वर्धापनदिन सोहळा आहे. आनंद, सकारात्मकता आणि स्नेहाचा संदेश देणार्या या कार्यक्रमाला नाशिककरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘देशदूत’ परिवारातर्फे करण्यात आले आहे.




