Monday, September 28, 2026
Homeसंपादकीयसंपादकीय : ४ सप्टेंबर २०२६ - नाशिकच्या विकासाचा सच्चा व खंबीर सोबती

संपादकीय : ४ सप्टेंबर २०२६ – नाशिकच्या विकासाचा सच्चा व खंबीर सोबती

गेल्या साडेपाच दशकांहून अधिक काळ नाशिक जिल्ह्याच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आणि शैक्षणिक परिवर्तनाचा सक्रिय साक्षीदार राहिलेल्या दैनिक ‘देशदूत’चा आज ५७ वा वर्धापनदिन साजरा होत आहे. साडेपाचहून अधिक दशकांचा प्रदीर्घ, संघर्षमय आणि तितकाच गौरवशाली प्रवास पूर्ण करून नव्या वर्षात पदार्पण करताना ‘देशदूत’ने नाशिककरांच्या मनावर जे अढळ राज्य केले आहे, तीच या वृत्तपत्राच्या प्रवासाची आजवरची सर्वात मोठी कमाई आहे. वृत्तपत्राची ओळख केवळ रोज सकाळी वाचकांच्या हातात पडणार्‍या कागदापुरती मर्यादित नसते; ती असते समाजाचा श्वास, जनसामान्यांचा आवाज आणि परिवर्तनाचा आरसा.

- Advertisement -

समाजातील प्रत्येक घडामोडीचे साक्षीदार आणि अन्यायाविरुद्ध परखडपणे आवाज उठवणारे माध्यम म्हणजे वृत्तपत्र. दैनिक ‘देशदूत’ने या सर्व आशा आणि अपेक्षा पूर्ण केल्या आहेत, असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. केवळ बातमी देणे म्हणजे पत्रकारिता नव्हे, तर बातमीमागचे सत्य शोधणे, वाचकांच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि शासन-प्रशासनाला उत्तरदायी धरणे हे एका खर्‍या लोकशाहीवादी वृत्तपत्राचे कर्तव्य असते. दैनिक ‘देशदूत’ने स्थापनेपासून आजवर या मूल्यांशी कधीही तडजोड केली नाही. नाशिकच्या मातीशी घट्ट नाळ जोडलेले हे वृत्तपत्र केवळ एक वर्तमानपत्र म्हणून न राहता ते येथील सार्वजनिक कुटुंबाचा अविभाज्य भाग बनले. देश-विदेशातील घडामोडींपासून आपल्या परिसरातील समस्यांपर्यंत चहाच्या कपाच्या सोबतीने चर्चा घडवून आणण्याचे कसब ‘देशदूत’ने सातत्याने जपले. गेल्या ५७ वर्षांत नाशिक शहर आणि जिल्ह्याने अभूतपूर्व बदल पाहिले आहेत.

एका शांत, निवांत आणि कृषिप्रधान जिल्ह्यापासून ते आजच्या आधुनिक तंत्रभूमीपर्यंतचा नाशिकचा प्रवास थक्क करणारा आहे. या संपूर्ण प्रवासात ‘देशदूत’ने नेहमीच जागल्याची भूमिका अत्यंत प्रामाणिकपणे निभावली आहे. शेतकरी वर्गाचे प्रश्न असोत, कामगारांच्या अडीअडचणी असोत, महिलांचे सबलीकरण असो किंवा युवकांच्या विकासाचे मार्ग असोत, ‘देशदूत’च्या पानांनी प्रत्येक घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष केला आहे. ‘देशदूत’च्या पानापानांवर समाजाच्या मनामनांतल्या भावना प्रखरपणे उमटल्या आहेत.

दुष्काळाच्या झळा असोत किंवा नैसर्गिक आव्हाने, ‘देशदूत’ने नेहमीच नाशिककरांच्या पाठीशी उभे राहून संकटसमयी आशेचा किरण दाखवला आहे. ऐंशीच्या दशकातील शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या चैतन्यपूर्ण कालखंडात परिणामांची पर्वा न करता सर्वसामान्य शेतकर्‍यांच्या बाजूने ‘देशदूत’ खंबीरपणे उभा ठाकला. कै. शरद जोशी, कै. माधवराव मोरे आणि कै. प्रल्हाद पाटील कराड या त्रिमूर्तींच्या साथीला ‘देशदूत’ने चौथ्या स्तंभाचा आधार दिला. अन्नदात्याच्या या अपूर्व चळवळीची जगभर चर्चा झाली, यात योगदान देता आले त्याबद्दलची धन्यता आजही ‘देशदूत’ला वाटते. तत्कालीन संपादक सुरेश अवधूत, त्यांचे पूर्वसुरी शशिकांत टेंबे आदींचा निर्भीड पत्रकारितेचा वसा आजही ‘देशदूत’ प्राणपणाने जपतो आहे.

माध्यमांच्या गळेकापू स्पर्धेतही सर्वसामान्य लोकांना ‘देशदूत’चा आधार वाटतो, यापरते आमच्यासाठी भाग्य ते कोणते? आजचे युग हे माहिती तंत्रज्ञान आणि डिजिटल माध्यमांचे युग आहे. सेकंदासेकंदाला बातम्या बदलत असताना, छापील वृत्तपत्रांसमोर अनेक नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. परंतु या बदलत्या प्रवाहातही ‘देशदूत’ने आपल्या विश्वासार्हतेला कधीही धक्का लागू दिलेला नाही. समाज माध्यमांच्या भाऊगर्दीत आणि खोट्या बातम्यांच्या (फेक न्यूज) सुळसुळाटात सत्य आणि खात्रीशीर बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचे कठीण व्रत ‘देशदूत’ने अव्याहतपणे सुरू ठेवले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करत डिजिटल विश्वातही आपले स्वतंत्र आणि मजबूत स्थान निर्माण करताना, पारंपरिक पत्रकारितेच्या उच्च मूल्यांशी कधीही फारकत घेतलेली नाही. हेच या वृत्तपत्राच्या निरंतर यशाचे खरे रहस्य आहे.

अग्रलेख, विशेष लेख, संपादकीय मते आणि परखड विश्लेषण यामुळे ‘देशदूत’ने बौद्धिक वर्तुळातही एक वेगळाच दरारा निर्माण केला आहे. समाजातील अनिष्ट रुढी-परंपरांवर कडक प्रहार करतानाच, नव्या विचारांचे स्वागत करण्याची सुसंस्कृत परंपरा जोपासली आहे. अनेक नवीन पत्रकारांना घडवण्याचे, त्यांना लोकशाहीची मूल्ये शिकवण्याचे काम एका विद्यापीठाप्रमाणे केले आहे. संपादक, पत्रकार, मुद्रक, वितरक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे लाडके वाचक यांच्या एकत्रित प्रयत्नांशिवाय हा सुवर्णप्रवास कधीच शय झाला नसता. आज ‘देशदूत’ साठीच्या दिशेने दमदार वाटचाल करत असताना, भविष्यातील आव्हाने मोठी आहेत हे नाकारता येत नाही. परंतु आजवरच्या संघर्षातून मिळालेली ऊर्जा आणि वाचकांचे अथांग प्रेम यामुळे येणारा काळही तितकाच तेजाळलेला असेल याची नि:संशय खात्री वाटते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात...