Tuesday, August 11, 2026
Homeब्रेकिंग न्यूजइगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस; धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

घोटी | जाकीर शेख Ghoti

- Advertisement -

‘महाराष्ट्राची चेरापुंजी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात अखेर पावसाने दमदार पुनरागमन करत अवघ्या दोन दिवसांत तब्बल ४०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतेत होता. मात्र ७ आणि ८ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने तालुक्यातील नद्या, ओढे आणि धरणांना नवसंजीवनी मिळाली असून सर्वत्र पावसाचे समाधानकारक चित्र दिसू लागले आहे.

तालुक्यात ८ जुलै रोजी सकाळी संपलेल्या २४ तासांत २०५ मिमी पावसाची नोंद झाली असून, या हंगामातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. या हंगामात आतापर्यंत ९३४ मिमी पाऊस झाला आहे. गतवर्षी याच कालावधीत तालुक्यात १,७९० मिमी पाऊस झाला होता. त्यामुळे यंदा अद्यापही सुमारे ८३० मिमी पावसाची तूट कायम आहे. विशेष म्हणजे, गतवर्षी २ जुलै रोजी विक्रमी २४० मिमी पावसाची नोंद झाली होती.

गेल्या काही आठवड्यांपासून कोरडे पडलेले दारणा, वाकी, भाम आणि भावली नदीपात्र मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा दुथडी भरून वाहू लागले आहेत. नदीकाठच्या परिसरात पाणी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. दारणा धरण परिसरातील बेलगाव-कुऱ्हे नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठची शेती पाण्याखाली गेली. साकूर गावाजवळील मुख्य रस्ता वळणावर खचल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण झाले, तर भावली धरणाच्या वर असलेल्या धामडकीवाडीच्या रस्त्यावर मातीचे मोठे ढिगारे कोसळल्याने वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.

जोरदार पावसाचा सर्वाधिक फायदा धरणसाठ्याला झाला आहे. अवघ्या दहा तासांत अनेक धरणांमध्ये लक्षणीय पाणी वाढ झाली. भावली धरणाचा साठा ७८.६० टक्क्यांवर पोहोचला, तर भाम धरणाचा साठा २४ टक्क्यांवरून ३८.४७ टक्क्यांपर्यंत वाढला. दारणा धरणातही सुमारे एक टीएमसी पाण्याची भर पडल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पावसामुळे धरण परिसरात पर्यटकांची गर्दी होऊ नये म्हणून पोलिसांनी भावली धरण परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या.

मुसळधार पावसामुळे भातशेतीला दिलासा मिळाला असला तरी अनेक ठिकाणी भाताची रोपे पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे दीर्घकाळ पाणी साचून राहिल्यास रोपे कुजण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

एकूणच, उशिराने सक्रिय झालेल्या पावसाने इगतपुरी तालुक्यातील धरणसाठा, नद्या आणि शेतीला मोठा दिलासा दिला असला तरी काही भागांत पूरसदृश परिस्थिती, रस्त्यांचे नुकसान आणि शेतीवरील संकट यामुळे प्रशासनासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी, शिंगणापूरमध्ये पार्किंगची पर्यायी व्यवस्था

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नाशिक कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नगर जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे मोठ्या संख्येने भाविक येण्याची शक्यता लक्षात घेऊन आवश्यक पायाभूत सुविधांची कामे जलदगतीने पूर्ण...