मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
शहरात काल रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने पहाटेपर्यंत बरसल्याने शहरातील अनेक झोपडपट्टींमध्ये तसेच दरेगाव परिसरातील दहा ते बारा यंत्रमाग कारखान्यांमध्ये पाणी घुसल्याने यंत्रमागावरील कापडासह वीजपंप व इतर साहित्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. घरात पावसाचे पाणी शिरल्याने झोपडपट्टीवासियांना रात्र जागून काढावी लागली.
शहरात गेल्या तीन-चार दिवसापासून परतीचा पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच पुर्व-पश्चिम भागातील भुयारी गटारीचे काम अर्धवट असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यातच पावसामुळे भुमीगत गटार योजनेचे काम सुरू असलेल्या परिसरात पाणी तुंबल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. काल रात्री सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत कोसळत असल्याने अनेक झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने नागरीकांचे हाल झाले.
येथील दरेगाव भागातील ओवाडी नालालगत संजरी नगर येथे परिसरातील नागरीकांकडून वर्गणी गोळा करुन मातीचा व मोरी टाकून पुल बांधला होता. रात्रभर सुरु असलेल्या पावसामुळे ओवाडी नाला ओसंडून वाहत होता. ओवाडी नाला परिसरात मोठ्या प्रमाणात नवीन वस्त्या आहे. नाल्यांमध्ये प्लॅस्टिक कचरा मोठ्या प्रमाणात साचलेला असल्याने हे पाणी वस्त्यांमध्ये घुसले. संजरी नगर भागात पुलाची निर्मिती करावी यासाठी अनेक वर्षापासून मनपा प्रशासनाला यंत्रमाग कारखानदार व नागरीकांतर्फे निवेदन दिले जात आहे. मात्र पुलाची निर्मिती करण्यात आलेली नाही.
शफीक मुल्ला यांच्यासह परिसरातील अनेक यंत्रमाग कारखान्यात पाणी घुसले. हे पाणी गुडघाभर असल्याने भीम, यंत्रमाग, ताणा-बाणा, वीजपंप आदी पाण्यात बुडून लाखो रूपयांचे नुकसान झाले. परिसरात ३० ते ४० घरांमध्ये देखील पाणी शिरल्याने नागरीकांचे हाल झाले. कारखानदारांनी जेसीबीच्या सहाय्याने नाल्यात अडकलेला कचरा स्वखर्चाने काढल्याने पाण्याचा प्रवाह मोकळा होवून अनेकांच्या घरातून पाणी कमी झाले.
दरम्यान, येथील गिरणा नदीपात्रात अचानक दुपारी साडेतीनला पाण्याचा प्रवाह वाढला असता कपडे धुण्यासाठी गेलेला जब्बार सय्यद नियामत सय्यद (४०, रा. गुलशेरनगर) हा तरुण नदीपात्रात अडकला. त्याला अग्निशमन दलाचे जवान तुकाराम जाधव, अमोल जाधव, शहबाज बेग, जालिंदर जाधव यांनी तासभर परिश्रम घेत नदीपात्रातून बाहेर काढले.




