अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये आनंददायी आणि तंत्रज्ञानस्नेही शैक्षणिक वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण विभागाने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या ध्येयधोरणांना अनुसरून राज्यातील 16 हजार उच्च प्राथमिक शाळांना ध्वनिक्षेपक प्रणाली संच (स्पीकर सेट) पुरवण्यास मान्यता देण्यात आली असून, या अंतर्गत 20 कोटी 80 लाख रुपयांचा निधी खर्च केला जाणार आहे. नगर जिल्ह्यात सुमारे दीड हजार प्राथमिक शाळा असून या सर्व या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, 2009 नुसार विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्याचा हक्क आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार शाळांमध्ये आनंददायी, उत्साहवर्धक, शैक्षणिकदृष्ट्या अनुकूल वातावरणात उच्च दर्जाचे शिक्षण देऊन मुलांना 21 व्या शतकातील प्रमुख कौशल्ये आत्मसात करून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व घडविण्यावर भर देण्यात आला आहे. या अनुषंगाने शाळांमध्ये उत्साही आणि गुणवत्तेचे वातावरण निर्माण होण्यासाठी राज्यातील उच्च प्राथमिक शाळांना ध्वनिक्षेपक प्रणाली संच देण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.
या पार्श्वभूमीवर, प्राथमिक शिक्षण संचालकांनी 16 हजार शाळांमध्ये शैक्षणिक साहित्याअंतर्गत ध्वनिक्षेपक प्रणाली संच देण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. या प्रस्तावाला शिक्षण विभागाने प्रशाकीय मान्यता दिली आहे. त्यानुसार प्राथमिक शिक्षण संचालकांकडून ई-निविदा मागवून ध्वनिक्षेपक प्रणाली संचांची खरेदी केली जाणार आहे. शाळेत कार्यक्रम घेण्यासाठी यंत्रणा बाहेरून आणावी लागते. त्यासाठी स्वतंत्र खर्च करावा लागतो. अनेकदा त्यासाठी निधी उपलब्ध नसतो. आता शासनाकडूनच ध्वनिक्षेपक प्रणाली देण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे. या प्रणालीमुळे दैनंदिन परिपाठ, अध्यापन, शाळेतील स्नेहसंमेलन, कार्यक्रमांसाठी ही प्रणाली उपयुक्त ठरेल. तसेच शाळेला खर्च करण्याची गरज राहणार नाही, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.




