Wednesday, February 4, 2026
HomeनाशिकNashik News: नाशिक शहरात गुंडगिरी, दादागिरीला थारा दिला जाणार नाही-मंत्री गिरीश महाजन

Nashik News: नाशिक शहरात गुंडगिरी, दादागिरीला थारा दिला जाणार नाही-मंत्री गिरीश महाजन

नाशिक | प्रतिनिधी
“नाशिक शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक पार्श्वभूमी आहे. या शहरात गुंडगिरीला थारा दिला जाणार नाही, दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कोणालाही कोणावर अन्याय करण्याची मुभा दिली जाणार नाही. ‘कुंदनपासून नाशिकला मुक्त करणे’ हेच एकमेव उद्दिष्ट आहे,” असे स्पष्ट वक्तव्य कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात कठोर पावले उचलली असून, मागील काही दिवसांमध्ये पोलिस विभागात तातडीने फेरबदल करण्यात आले आहेत आणि कठोर कारवाई सुरू झाली आहे. “घर बळकावणे, दादागिरी करणे, खंडणी मागणे अशा प्रकारांना अजिबात थारा दिला जाणार नाही. कोणाच्या जमिनी बळकावल्या असतील तर त्यांनी निःसंकोच तक्रार करावी; मुख्यमंत्री फडणवीस स्वतः अशा प्रकरणांवर थेट ॲक्शन घेतील,” असेही महाजन यांनी सांगितले.

- Advertisement -

पक्षातील काही गुंडांवर पोलिसांनी कारवाई केली असल्याचे निदर्शनास आणल्यावर ते म्हणाले, “अशा व्यक्तींना आम्हीही माफ करत नाही. आगामी निवडणुकीत त्यांना तिकीट द्यायचे की नाही, यावर विचार केला जाईल. आवश्यक असल्यास अशांना पक्षातूनही काढले जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

YouTube video player

खड्डेमुक्त नाशिकसाठी प्रयत्न
नाशिक शहरातील खड्ड्यांच्या समस्येबाबत विचारले असता मंत्री महाजन म्हणाले, “शहरात खड्ड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. मुख्यमंत्र्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आहे. शहराला खड्डेमुक्त करण्यासाठी १२० कोटी रुपयांचे टेंडर अंतिम टप्प्यात आहेत. पुढील पाच-सहा दिवसांत व्हाईट टॉपिंगच्या रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होईल. नवे सर्व रस्ते व्हाईट टॉपिंगचे बनवण्यात येतील, जेणेकरून पुढील दहा-पंधरा वर्षे रस्त्यांना खड्डे पडणार नाहीत,” अशी माहिती त्यांनी दिली.

गुन्हेगारांवर कठोर कारवाई
मुख्यमंत्री फडणवीस यांनी गुन्हेगारांविरुद्ध कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत. “काही गुंडांना अतिमाज आला होता — चाकूचा वापर, एमडीचा व्यापार, मारामाऱ्या, जमिनी बळकावणे अशा गुन्ह्यांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. परंतु आता कोणाच्याही दबावाखाली न राहता कारवाई सुरू झाली आहे. कोणत्याही पक्षाच्या गुंडाला आता माफी नाही,” असे महाजन म्हणाले. गरीब नागरिकांच्या जमिनी बळकवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कुंभमेळा कामांमध्ये ‘क्लब टेंडरिंग’ नाही
कुंभमेळ्याच्या विकासकामांमध्ये ‘क्लब टेंडरिंग’ झाल्याच्या आरोपांबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “अशी टीका निराधार आहे. गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण होणारी कामे करण्यासाठीच ठेकेदार निवडले आहेत. प्रत्येक काम दर्जेदार व्हावे, हेच आमचे उद्दिष्ट आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

कारागृहातील गैरप्रकारांवर कारवाई
कारागृहांमध्ये गांजा, मोबाईल फोन यांसारख्या गैरप्रकारांची प्रकरणे समोर येत असल्याच्या प्रश्नावर महाजन म्हणाले, “गृहमंत्री आणि मुख्यमंत्री हेच असल्याने, या प्रकरणांची चौकशी होईलच. दोषी अधिकारी अथवा संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,” असे त्यांनी सांगितले.

ओबीसींना न्याय मिळेल
ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नावर बोलताना महाजन म्हणाले, “प्रत्येकाला आपल्या हक्कासाठी लढण्याचा अधिकार आहे. मुख्यमंत्री स्वतः या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत. ओबीसींना न्याय दिला जाईल आणि त्यांच्या आरक्षणाला कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही,” असे ते म्हणाले.

राजकीय समीकरणांवर भाष्य
आगामी निवडणुकीबाबत विचारले असता महाजन म्हणाले, “कोणी कोणासोबत यावे किंवा लढावे हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष मात्र महायुतीच्या चौकटीत राहूनच लढणार आहे. कोण कुणासोबत गेल्यामुळे निकालात काय फरक पडतो, हे निवडणुकीनंतरच स्पष्ट होईल.”

शिवसेनेतील प्रवेशाबाबत विचारले असता त्यांनी खोचक भाषेत म्हटले, “आपण कुणाला घेतो याचे भान प्रत्येक पक्षाला असले पाहिजे. इतरांवर बोट दाखवताना आनंद वाटतो, पण आता याबाबतचे उत्तर संजय राऊत यांनीच द्यावे.”

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Ravindra Pagar Passed Away : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र पगार...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रविंद्र नाना पगार (Ravindra Pagar) यांचे अल्पशा आजाराने (आज दि.३) निधन झाले. त्यांचा अंत्यविधी बुधवार दि....