Friday, May 3, 2024
Homeनगरहाऊसिंग को-ऑपरेटीव्ह संस्थेत अनियमित कारभार

हाऊसिंग को-ऑपरेटीव्ह संस्थेत अनियमित कारभार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

शहरातील म्हाडा कॉलनीतील श्रीदत्त म्हाडा हाउसिंग को-ऑपरेटीव्ह संस्थेत हंगामी व्यवस्थापन समिती पदाधिकार्‍यांकडून अनियमित पद्धतीने कामकाज सुरू आहे. संस्था स्थापन होऊन वर्ष झाले, तरी अजून सभासदांची सार्वत्रिक बैठक घेतलेली नाही. मात्र स्वत: घेतलेले निर्णय सदनिकाधारकांवर लादण्याचे काम मुख्य प्रवर्तक करत असून या संस्थेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी सभासदांच्यावतीने सहाय्यक निबंधक संदीपकुमार रुद्राक्ष यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

- Advertisement -

निवेदनात म्हटले आहे की, येथील म्हाडा गृहप्रकल्पामध्ये जवळपास 136 सदनिका व 20 गाळे आहेत. यातील जवळपास सर्वच सदनिकांचे वाटप झाले असल्याने हाउसिंग सोसायटी स्थापन करणे गरजेचे होते. संस्था स्थापन करण्यासाठी संस्थेच्या मुख्य प्रवर्तकाने सदनिकाधारकांची सार्वत्रिक बैठक घेणे अपेक्षीत होते. परंतु कागदोपत्री बैठक झाल्याचे दाखविण्यात आले. सदनिकाधारकांच्या परस्पर सह्या घेतल्या. संस्था स्थापनेनंतर तीन महिने उलटूनही सभासदांची एकही बैठक घेतली नाही.

बैठक अथवा चर्चा न करता मर्जीतील सदनिकाधारकांची हंगामी व्यवस्थापन समितीत वर्णी लावली. खर्चाचा तपशिल न देता मेन्टनन्सची नोटीस पाठविण्यात आली. येथील 80 टक्के सदनिकाधारक आर्थिकदृष्ट्या सक्षम नाहीत. याबाबत वेळोवेळी प्रवर्तकांशी चर्चा केली. परंतु त्यांनी प्रतिसाद दिला नाही. पत्रव्यवहार केल्यानंतर व काही संचालकांच्या दबावामुळे कुठल्याही अजेंड्याविना बेकायदेशीर बैठक घेऊन समाधानकारक माहिती न देता सभासदांची बोळवण केली.

ही बैठक होऊनही पाच महिने उलटले, हंगामी समितीची मुदत जुलै महिन्यात संपत आली असतानाही हिशोब देण्यास व नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्यात पदाधिकारी चालढकल करत आहेत. संस्थेचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे या संस्थेची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

निवेदनावर योगेश वांढेकर, सुजाता किरण कपोते, सारिका अनिल मोरे, वंदना गायकवाड, रोहित बनकर, गिरीश खैरनार, अमोल रंजाळे, छेदीलाल मौर्य आदींच्या सह्या आहेत.

नोंदणी खर्चाच्या रकमेत गैरव्यवहार ?

संस्था स्थापन करताना आतापर्यंत 80 सभासदांकडून प्रत्येकी अडीच हजार असे 2 लाख जमा करण्यात आले. मात्र ही रक्कम पदाधिकार्‍यांनी त्यांच्या वैयक्तिक खात्यावर गोळा केली. शेअर्स व प्रवेश फी वजा जाता 1 लाख 52 हजारांची रक्कम संस्था नोंदणी करण्यासाठी खर्च झाल्याचे प्रवर्तक सांगत आहेत. आता गरज नसताना नवीन होणार्‍या सभासदांकडून अतिरीक्त पैशाची मागणी होत असून यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय निवेदनात व्यक्त करण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या