मुंबई । Mumbai
राज्य सरकारकडून एचएसआरपी (HSRP) अर्थात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. ३१ मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओ विभागाकडून कारवाई केली जाऊ शकते.
देशभरातील वाहन उत्पादक कंपन्यांना १ एप्रिल २०१९ पासून नवीन वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट देणे बंधनकारक केले होते. नव्याने वाहन खरेदी केल्यानंतर या नंबरप्लेट उपलब्ध होतात. हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी तयार केल्या आहेत. ही प्लेट होलोग्राम स्टिकरसह येते. त्यावर इंजिन आणि चेसिस क्रमांक लिहिलेला असतो आणि हा नंबर प्रेशर मशिनद्वारे लिहिला जातो.
हाय सिक्युरिटी नंबर प्लेटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते. कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबरप्लेट वाहनाच्या मालकासह सर्व माहिती देते.
दि. ०१ एप्रिल २०१९ पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने एचएसआरपी नंबर प्लेट बंधनकारक केलेली आहे. सर्व वाहन वितरक हे एचएसआरपी नंबर प्लेट बसवूनच वाहने ताब्यात देतात. आता दि. ०१ एप्रिल २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्च २०२५ पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केलेले आहे. ३१ मार्चनंतर रस्त्यावर एचएसआरटी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
एचएसआरटी नंबर प्लेटची किंमत काय?
- मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी 450 रुपये + जीएसटी
- थ्री व्हीलरसाठी 500 रुपये + जीएसटी
- फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी 745 रुपये + जीएसटी
नंबर प्लेट कुठे मिळेल?
- transport.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करावी लागेल.
- यानंतर फिटमेंट सेंटरची लिस्ट सिलेक्ट करावी लागेल
- तुमच्या नजीकचे फिटमेंट सेंटर सिलेक्ट करा.
- आपल्याला मिळालेल्या तारखेच्या दिवशी फिटमेंट सेंटरला जा. तिथे गेल्यावर वेंडर आपल्या वाहनाला नंबर प्लेट बसवून देईल. नंबर प्लेट बसवून त्याची नोंद वेंडर वाहन प्रणालीत करेल.
अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा
शासनाचे अधिकृत वेंडर वगळता इतर कोणत्याही ठिकाणाहून ही नंबर प्लेट बदलून घेऊ नये. इतर ठिकाणाहून एचएसआरपी सारखी दिसणारी नंबर प्लेट बसवली तर त्या नंबर प्लेटच्या पिन नंबरची नोंद वाहन प्रणालीत होणार नाही. वाहन प्रणालीत आपली एचएसआरटी पेंडींगवर दिसेल. त्यामुळे अधिकृत वेंडरकडूनच नंबर प्लेट बसवा.