Monday, July 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजगोदातीरी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; साखळी उपोषणाचा शेतकऱ्यांचा निर्धार कायम

गोदातीरी उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; साखळी उपोषणाचा शेतकऱ्यांचा निर्धार कायम

पंचवटी । प्रतिनिधी Panchavati

- Advertisement -

आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकसाठी प्रस्तावित असलेल्या ६६ किलोमीटरच्या बाह्य रिंगरोड भूसंपादनाचा वाद आता अधिकच पेटला आहे. रामकुंडावर गोदातीरी गेल्या २६ मे पासून आमरण उपोषणाला बसलेले शेतकरी नेते अ‍ॅड. कैलास खांडबहाले, साहेबराव दातीर आणि सचिन जाधव यांची प्रकृती उपोषणाच्या पाचव्या दिवशी (शनिवारी, ३० मे) अचानक खालावली. त्यांना उपचारासाठी तातडीने आधी इंदिरा गांधी रुग्णालयात आणि त्यानंतर खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मुख्य नेत्यांची प्रकृती बिघडली असली तरी आंदोलन मागे न घेता, आजपासून ‘साखळी उपोषण’ सुरू ठेवण्याचा ठाम निर्धार बाधित शेतकऱ्यांनी केला आहे.

शनिवारी आंदोलक शेतकरी गोदावरीच्या नदीपात्रात उतरून तीव्र ‘जलआंदोलन’ करणार होते. मात्र, सकाळीच तिन्ही मुख्य उपोषणकर्त्यांना डिहायड्रेशन, रक्तदाब (बीपी) आणि शुगरचा त्रास सुरू झाल्यामुळे प्रशासनाने त्यांना तातडीने रुग्णालयात हलवले.या प्रस्तावित रिंगरोडमुळे जिल्ह्यातील २७ गावांमधील शेतकऱ्यांची अत्यंत सुपीक शेतजमीन संपादित केली जाणार आहे. “रिंगरोडऐवजी ‘डीपी’ (विकास योजना) व ‘टीपी’ (नगर रचना योजना) राबवावी, पण शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये,” या प्रमुख मागणीसाठी शेतकरी गेल्या पाच दिवसांपासून गोदातीरावर एकवटले आहेत.

राजकीय नेत्यांचा पाठिंबा आणि प्रशासनाचा निषेध
आंदोलनस्थळी आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे, हिरामण खोसकर यांच्यासह विविध राजकीय नेत्यांनी भेटी देऊन शेतकऱ्यांच्या मागण्यांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. दरम्यान, हक्काची जमीन जात असल्याने संतापलेल्या आंदोलनकर्त्यांनी प्रांताधिकारी पवनकुमार दत्त यांचा प्रातिनिधिक दशक्रिया विधी करण्याचा प्रयत्न करत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली असली, तरी अद्याप कोणताही ठोस आणि लेखी तोडगा निघालेला नाही.

“प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केवळ शेतकऱ्यांची जमीनच नाही, तर त्यांचा विश्वासही संपादन केला पाहिजे. जिल्हाधिकाऱ्यांचा हेतू प्रामाणिक असेल तर त्यांनी बंद दाराआड ‘ऑफ द रेकॉर्ड’ चर्चा करण्याऐवजी जाहीरपणे ‘ऑन द रेकॉर्ड’ भूमिका मांडावी. आमच्या सहकाऱ्यांची प्रकृती खालावली असली तरी आमचे आंदोलन थांबणार नाही, साखळी उपोषण सुरूच राहील.”
विनोद नाठे (शेतकरी नेते)

‘या’ २७ गावांतील शेतकऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
या भूसंपादनामुळे बाधित होणाऱ्या पुढील गावांमध्ये चिंतेचे वातावरण असून, तेथील शेतकरी आता आंदोलनाची पुढील दिशा काय ठेवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे:

बाधित गावे – चिंचोली, वडगाव, पिंगळवाडे, लोखंडेवाडी, धामणवाडी, जोपुळ, पालखेड, चिंचखेड, ढकांबे, मानोरी, आशेवाडी, गौळवाडी, विंचूर गवळी, पाथर्डी, गौळाणे, आंबे बहुला, आडगाव, पारदेवी, सारूळ, राजुर बहुला, अंबड, सातपूर आणि चिंचोळे.

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरा धरणातील साठा आज 4000 दलघफूच्या पुढे जाणार

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण पाणलोटात शनिवारच्या तुलनेत रविवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात पाण्याची आवक जोमाने होत आहे. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील...