मुंबई | Mumbai
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी कुणाची नियुक्ती करावी, या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीमध्ये प्रामुख्याने अश्विनी भिडे , मिलिंद म्हैसकर आणि असीम गुप्ता यांच्या नावांची चर्चा होती. या बैठकीनंतर अश्विनी भिडे यांनी शिंदे यांची नंदनवन निवासस्थानी भेट घेत अर्धा तास चर्चा केली. या भेटीनंतर भिडे यांचा आयुक्तपदाचा मार्ग मोकळा झाला होता.
आज मंगळवारी, मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी मेट्रो वुमेन अश्विनी भिडे यांनी नियुक्ती करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने अश्विनी भिडे यांच्याकडे मुंबई महापालिका आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात येत असल्याचे जाहीर केले. सनदी अधिकारी अश्विनी भिडे या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अतिशय निकटवर्तीय अधिकारी मानल्या जातात.
सध्याचे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे ३१ मार्च २०२६ रोजी सेवानिवृत्त होत असल्याने, मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तपदी कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. यामध्ये सनदी अधिकारी मिलिंद म्हैसकर, महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव विकास खारगे, एमएमआरडीएचे आयुक्त संजीव मुखर्जी, सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव व्ही राधा यांची नावे आघाडीवर होती. परंतु या सगळ्यांना मागे सारत अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिका आयुक्तपदी वर्णी लागली आहे.
फडणवीसांचा आग्रह आणि अश्विनी भिडेंचं नाव निश्चित
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या अश्विनी भिडे यांच्या नावासाठी, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या नगरविकास विभागात अतिरिक्त मुख्य सचिव असीम गुप्ता यांच्या नावासाठी आग्रह धरला होता. मात्र, सोमवारी रात्री आधी फडणवीस-शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर अश्विनी भिडे यांनी शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन अर्धा तास चर्चा केल्यानंतर आयुक्तपदाच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते.

कोण आहे अश्विनी भिडे?
अश्विनी भिडे या १९९५च्या बॅचच्या आयएएस अधिकारी असून, त्यांनी आतापर्यंत विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. सध्या त्या मुख्यमंत्री कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून कार्यरत आहेत. शिवाय त्या मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या व्यवस्थापकीय संचालकपदाची जबाबदारीही सांभाळत आहेत. त्यांच्या कामकाजाची दखल घेत त्यांना ‘मेट्रो वूमन’ म्हणून ओळख मिळाली आहे. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही त्यांच्या कार्याचे वेळोवेळी कौतुक केले आहे. मुंबई महापालिकेत शिवसेना पक्ष भाजपसोबत सत्तेत असल्याने त्यांच्या मतालाही विशेष महत्त्व दिले जाऊ शकते.




