आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक स्पर्धेमध्ये आज चेन्नईतील एम ए चिदंबरम मैदानावर भारत विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यात क्रिकेटचा सामना खेळविण्यात आला. भारतीय संघाकडून अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्याने तुफान फटके बाजी करत केलेले अर्धशतक व इशान किशन, सुर्यकुमार यादव आणि तिलक वर्माची निर्णायक धडकेबाज फलंदाजीने ४ गडी बाद २५६ धावांचा डोंगर उभारत २५७ धावांचे आव्हान झिम्बाब्वेच्या संघास दिले. झिम्बाब्वेच्या संघाने ६ गडी बाद १८४ धावा केल्या. भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळविला. भारतीय संघाला उपांत्य फेरीसाठी आजच्या सामन्यात आपले स्थान कायम राखण्यासाठी झिम्बाब्वे सोबतच्या सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार होता. त्यास अनुसुरून भारतीय संघासाठी आजचा सामना महत्वपूर्ण होता तसा भारतीय संघाने विजय संपादित केला असून आजच्या सामन्यानंतर वेस्ट इंडिज विरूद्धच्या सामन्याकडे आता क्रिकेट रसिकांचे लक्ष आहे.
नाणेफेक जिंकून झिम्बाब्वेच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संजू सैमसन व अभिषेक शर्मा भारतीय संघाकडून सलामीला फलंदाजीसाठी आले. सलामीला आलेल्या भारतीय फलंदाजांनी जोरदार फटके बाजीने सामन्याची सुरुवात केली. ४ थ्या षटकात बी.मुजराबानीच्या गोलंदाजीवर रायन बर्लने आक्रमक खेळी करत असलेल्या संजू सैमसनला झेल बाद केले. संजू सैमसनने १५ चेंडूत २ षटकार व १ चौकार लगावत २४ धावा केल्या. दहाव्या षटका पर्यंत अभिषेक शर्मा व ईशान किशनने जोरदार फटके बाजी करत मजबूत धावसंख्या केली. १० व्या षटका अखेर भारतीय संघाच्या १ गडी बाद १०९ धावा होत्या.
११ व्या षटकात सिकंदर रझाच्या गोलंदाजीवर रिचर्ड नागरावाने इशान किशनला झेल बाद केले. ईशान किशनने २४ चेंडूत ३८ धावा केल्या.१२ व्या षटका अखेरीस भारतीय संघाच्या २ गडी बाद १३४ धावा अशी स्थिती होती. सामन्याच्या १३ व्या षटकात आजच्या सामन्यात अर्धशतक करणारा अभिषेक शर्माला सिंकदर रझा करवी झेल बाद झाला. अभिषेक शर्माने ३० चेंडूत ४ चौकार व ४ षटकार लगावत एकूण ५५ धावा केल्या. 15 व्या षटकात ताशिंगा मुसेकिवान करवी भारतीय संघाचा कर्णधार सुर्यकुमार झेल बाद झाला. सुर्यकुमार यादवने १३ चेंडूत ३३ धावा केल्या.
हार्दिक पांड्याने २३ चेंडूत ४ षटकार व २ चौकार लगावत नाबाद ५० धावा केल्या तर तिलक वर्माने १६ चेंडूत ४ षट्कार व ३ चौकार लगावत ४४ धावा केल्या. २० व्या षटका अखेर भारतीय संघाने ४ गडी बाद २५६ धावांचा डोंगर उभारून २५७ धावांचे आव्हान झिम्बाब्वेच्या संघापुढे ठेवले.
२५७ धावांचे आव्हान पार करताना झिम्बाब्वेच्या संघाकडून ब्रायन बेनेट व टी मरुमणी प्रथम फलंदाजीस आले.७ व्या षटकात अक्षरपटेलच्या गोलंदाजीवर इशान किशनने टी मरुमणीला झेल बाद करत झिम्बाब्वेच्या संघास पहिला धक्का दिला.टी मरुमणीने २० चेंडूत २० धावा केल्या. १० व्या षटकात वरून चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तिलक वर्माने डायन मायर्सला ६ धावांवर झेल बाद केले. १४ व्या षटका अखेरीस झिम्बाब्वेच्या संघाने २ गडी बाद १०५ धावा केल्या.
१७ व्या षटकात अर्शदीपसिंघच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने सिकंदर रझाला ३१ धावांवर झेल बाद करत झिम्बाब्वेच्या संघाचा तिसरा खेळाडू बाद केला. तर अर्शदीप सिंघच्या गोलंदाजीवर रायन बर्ल शून्य धाव संख्येवर पायचीत होत तंबूत परतला. सलामीला आलेल्या ब्रायन बेनेट ५९ चेंडूत नाबाद ९७ धावा केल्या. तर १९ व्या षटकाच्या अखेरीस अर्शदीप सिंघने टोनी मुन्योंगाला ११ धावांवर त्रिफळाचीत करत झिम्बाब्वेच्या संघाचा पाचवा खेळाडू बाद केला. संजू सैमसनने ताशिंगा मुसेकिवाला झेल बाद करत ६ वा गडी बाद केला
२० व्या षटका अखेर झिम्बाब्वेच्या संघाने ६ गडी बाद १८४ धावा केल्या, भारतीय संघाने झिम्बाब्वेवर ७२ धावांनी विजय मिळविला.




