Tuesday, May 7, 2024
Homeक्रीडाICC World Cup : कोलंबो विजयाची दिमाखदार पुनरावृत्ती

ICC World Cup : कोलंबो विजयाची दिमाखदार पुनरावृत्ती

अवघ्या दीड महिन्यापूर्वी झालेल्या लाजिरवाण्या पराभवाची नवी आवृत्ती श्रीलंकेच्या नशिबात आली. आधी घरच्या मैदानावर कोलंबोमध्ये आणि गुरुवारी मुंबईत. त्या वेळेस श्रीलंकेचा संघ 50 धावांमध्ये गुंडाळला गेला. त्यात पाच धावांची भर पडल्याचं सुख मानायचं? की ह्या सामन्यातला डाव 26 चेंडू अधिक चालल्याचा आनंद? तेव्हाचा 10 गडी राखून पराभव अधिक मानहानिकारक की विश्वचषकात 302 धावांनी झालेली हार अधिक दारूण? पण या विजयानं भारतीय संघ दिमाखात सेमी फायनलमध्ये दाखल झाल्याचा आनंद अधिकच…

यजमान भारतानं क्रिकेटच्या राजधानीत श्रीलंकेपुढे अनेक प्रश्नचिन्हांची मालिका उभी केली. ह्याच दिमाखदार विजयामुळं उपान्त्य फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ भारत ठरला. पहिल्या डावात जोरदार, आकर्षक फटकेबाजीचा आऩंद लुटणार्‍या मुंबईकर प्रेक्षकांना दुसर्‍या डावांत तिखट नि धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आशिया चषकातील अंतिम लढतीपासून धडा श्रीलंकेनं मुंबईत घेतल्याचं दिसलं. नाणेफेक जिंकल्यावर त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा आनंद दुसर्‍याच चेंडूवर त्यांना मिळाला. त्यानंतरचं यश मिळविण्यासाठी 178 चेंडू वाट पाहावी लागली. दिलशान मधुशंक ह्यानं पाच बळी मिळविले खरे; पण त्याची तेवढीच पिटाईही झाली. दुसर्‍या डावात खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक अनुकूल ठरेल, हा होरा स्वतः कुशल मेंडीसनं सहकार्‍यांच्या मदतीनं पार खोटा ठरवला.

- Advertisement -

श्रीलंकेच्या एकूण धावांहून भारताच्या धावा साडेसहापट अधिक. तीन फलंदाजांची वैयक्तिक धावसंख्याही त्यापुढे सरस. सलामीवीर शुभमन गिलच्या (92 चेंडूंमध्ये 92, 11 चौकार व 2 षट्कार) धावा त्यांच्यापेक्षा जवळपास पावणेदोन पट अधिक. सामन्यातला पहिलाच चेंडू खेळताना थोडक्यात बचावलेल्या विराट कोहलीच्या धावा (94 चेंडूंमध्ये 88, 11 चौकार) त्याहून 1.6 पट जास्त. चौथ्या क्रमांकावर येऊन मोक्याच्या क्षणी धावसंख्येला भिर्र गती देणार्‍या श्रेयस अय्यरच्या धावा श्रीलंकेहून दीडपट अधिक! त्याची 82 धावांची खेळी फक्त 56 चेंडूंची. त्यात 3 चौकार आणि त्याच्या दुप्पट षट्कार. जेवढ्या धावा करताना श्रीलंकेची हबेलहंडी उडाली, त्याहून अधिक धावा त्यांच्या चार प्रमुख गोलंदाजांनी दिल्या. दिलशाननं 80, दुष्मंत चमीर ह्यानं 71, महीश तीक्षण ह्यानं 67 आणि कसून राजित ह्यानं 65. श्रीलंकेच्या पाच फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही. त्यातही दोन्ही सलामीवीरांसह तिघांच्या नशिबी गोल्डन डक! पहिल्याच चेंडूवर बाद होण्याची नामुष्की.

भारताच्या डावात श्रीलंकेनं इतर धावा 20 दिल्या. तेवढ्या त्यांच्या एकाही फलंदाजाला करता आल्या नाहीत. सर्वाधिक 14 धावा करणारा राजित दहाव्या क्रमांकावर खेळायला आलेला. पहिल्या पाच फलंदाजांनी मिळून दोन धावा केल्या. आणि शेवटच्या तिघांनी 31! डावातले सहापैकी पाच चौकार त्यांचेच. दुहेरी धावसंख्या गाठणार्‍या तिघांमध्ये अँजेलो मॅथ्यूज आणि जोडीदारच न उरल्यामुळे नाबाद राहिलेला महीश (प्रत्येकी 12) ह्यांचा समावेश. दोन फलंदाज पायचित आणि दोघांचा साफ त्रिफळा उडालेला. स्पर्धेत दुसर्‍या वेळी पाच बळी घेण्याची कामगिरी करणार्‍या महंमद शमीचा मारा अफलातूनच होता. दर सहा चेंडूंमागे खात्यात बळी आणि त्यासाठी त्यानं फक्त 18 धावांचं मोल दिलं. ही कामगिरी करणार्‍या शमीच्या नावावर दोन विक्रमांची नोंद झाली – भारताकडून सर्वाधिक बळी – 14 सामन्यांत 45 आणि चार किंवा त्याहून अधिक बळी सात वेळा मिळवणारा विश्वचषकाच्या इतिहासातला पहिला गोलंदाज.

ह्या स्पर्धेत सूर न सापडलेला आणि ज्याला वगळून अश्विनला संधी देण्याची मागणी सोशल मीडियातून चालू होती, त्या महंमद सिराजनंही तिखट मारा केला. आशियाई चषकाच्या अंतिम सामन्याची आठवण करून देणारा! त्याचे 7 षट्कांत तीन बळी. कोलंबोतील लढतीत श्रीलंकेनं 6 गडी गमावले ते 12 धावांवर. मुंबईत तीच अवस्था होती, धावसंख्येत फक्त दोनाची भर पडलेली. सर्वाधिक 25 चेंडू अँजेलो मॅथ्यूज खेळला. चरीत असलंक 24 चेंडू टिकला. त्यात त्याला कशीबशी एक धाव करता आली. तळाच्या तीन फलंदाजांचाच स्ट्राईक रेट पन्नासच्या पुढे. मॅथ्यूजचा त्याच्या जवळ येणारा. ही सगळी कहाणी भारताच्या जलदगती गोलंदाजीमुळं श्रीलंकेला कसा ठसका लागला, हे सांगणारी. त्या आधीची 50 षट्कंही एखाद-दुसरा अपवाद वगळता भारतीय फलंदाजांनी गाजविलेल्या वर्चस्वाची. दुसर्‍याच चेंडूवर कर्णधार रोहित शर्माचा त्रिफळा उडालेला, चमीर ह्याची पहिली दोन्ही षट्कं निर्धाव गेलेली. ह्याचं दडपण गिल-कोहली ह्यांनी यथावकाश पद्धतशीरपणे झुगारलं.

विराटही पहिल्याच चेंडूवर बचावला. त्यानं मारलेला फ्लिक शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्ररक्षकाच्या पुढ्यात पडला. पाचव्या षट्कातला पाचव्या आणि सहाव्या षट्कातल्या पहिल्या चेंडूवर श्रीलंकेनं दोन संधी गमावल्या. मधुशंकच्या चेंडूवर लवकर ड्राइव्ह खेळण्याची घाई शुभमनच्या अंगाशी आलीच होती. कव्हर पॉइंटवरच्या असलंक ह्यानं तिरपा सूर मारला. चेंडू त्याच्या हाती आला आणि खाली पडला. थो़डा लवकरच फटका खेळण्याची चूक कोहलीलाही नडली असतीच. पण चमीर ह्याला आपल्याच गोलंदाजीवरचा झेल काही पकडता आला नाही. मातीत मिळालेल्या ह्या दोन झेलांनी श्रीलंकेच्या दारूण पराभवाचं नशीबच लिहून टाकलं. पहिल्या पॉवर प्लेमध्ये भारतानं 60 धावा केल्या. (गंमत म्हणजे त्याच पॉवर प्लेमध्ये श्रीलंकेच्या खात्यावर 14 धावा होत्या!) पुढच्या 10 षट्कांत तेवढ्याच धावा निघाल्या. त्या दरम्यान गिल व कोहली ह्यांनी अर्धशतकं पूर्ण केली होती. हे दोघंही शतकाच्या अगदी जवळ येऊन पाठोपाठ बाद झाले. त्यांच्या 189 धावांच्या (179 चेंडू) भागीदारीनं भारताची स्थिती भक्कम केली. दोघांनाही बाद केलं मधुशंक ह्यानेच. त्यानंतर भारताच्या धावगतीला खीळ बसते की काय, अशी शंका वाटत होती.

श्रेयस अय्यरनं सुरुवातीपासूनच इरादा स्पष्ट दाखवला होता. त्यानं राहुलच्या जोडीनं 60 धावांची भर घातली. तो आणि सूर्यकुमार ही जोडी आतषबाजी करणार अशी चिन्हं दिसत असतानाच सूर्यकुमार बाद झाला. शेवटच्या 10 षट्कांमध्ये भारतानं 93 धावा केल्या, त्या अय्यर व रवींद्र जाडेजा ह्यांच्या फटकेबाजीमुळं. अठ्ठाविसाव्या षट्कातील चौथ्या चेंडूवर भारताचा पहिला षट्कार गेला. त्यानंतर मात्र आठ षट्कारांची बरसात झाली. स्पर्धेत भारतानं पहिल्यांदाच त्रिशतकी धावसंख्या ओलांडली. विजयही त्रिशतकी फरकाने. भारताचा विश्वचषकातला सर्वांत मोठा विजय! ऑस्ट्रेलियाचा 309 धावांनी विजयाचा विक्रम मात्र भारताला मोडता आला नाही. श्रीलंकेनं 1996च्या स्पर्धेत भारताला आधी गटात हरवलं. कोलकात्यातील तो उपान्त्य सामना कुप्रसिद्ध आहेच. त्यानंतर 2007मध्येही लंकेनं विजय मिळविला होता. त्या सर्व पराभवांचा सणसणीत बदला भारतानं गुरुवारी घेतला. गंगा एवढी अंगणी येऊन धो धो वाहत असताना आपण कोरडेच राहिल्याची खंत रोहित शर्मा (2 चेंडूंमध्ये 4), सूर्यकुमार (9 चेंडूंमध्ये 12) आणि कुलदीप यादव (बळी न मिळालेला एकमेव गोलंदाज) ह्यांना वाटली असेल कदाचीत. पण प्रचंड विजयात ती कुठल्या कुठे वाहून गेली असेल, हे नक्की.

सतीश स. कुलकर्णी

[email protected]

(मुक्त पत्रकार व ब्लॉगर)

- Advertisment -

ताज्या बातम्या