Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखमर्यादा रेषा ओळखा

मर्यादा रेषा ओळखा

जगाने मोबाईल शोधाची पन्नास वर्षे नुकतीच साजरी केली. मोबाईल क्रांती प्रसाराच्या वेगाने भल्याभल्यांना थक्क केले. मार्टिन कुपर हे मोबाईलचे शोधकर्ते. तेही याला अपवाद नाहीत. देशात दूरसंचार सर्वत्र पोहोचण्यासाठी जितका वेळ लागला त्याच्या कैकपटींनी कमी वेळात मोबाईलने ‘दुनिया मुठ्ठी मैं’ केली. 2022 मध्ये देशात 1.2 अब्ज लोक मोबाईल वापरत होते. ही संख्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माध्यमांना दिली. आत्तापर्यंत हा आकडा निश्चितपणे प्रचंड वाढला असेल. मोबाईल शोधाच्या फायद्यांची यादी मोठीच आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेच्या वापराने मोबाईलची उपयुक्ततता प्रचंढ वाढवली. हाताच्या पंजात मावणार्‍या या उपकरणात लोकांचे दैनंदिन जगणे सामावले. त्यात संवाद, करमणूक, दैनंदिन असंख्य कामे आणि आर्थिक व्यवहार आलेच. तथापि हळूहळू मोबाईल वापराचे तोटेही जगाच्या लक्षात येत आहेत. फायद्याबरोबरच तोट्यांची यादीही नि:संशय मोठीच आहे. मोबाईलचा अती वापर मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. सामाजिक स्वास्थ्याचाही प्रश्न गंभीर आहे. सायबर गुन्हेगारी वाढत आहे. जगात घडणार्‍या सायबर गुन्ह्यांपैकी सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त गुन्हे भारतात घडतात अशी माहिती राज्याचे माजी पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी माध्यमांना दिली. समाजातून मुल्ये हद्दपार होत असल्याचे दु:ख जाणकार व्यक्त करतात. त्याचेच प्रतिबिंब मोबाईल वापरात दिसते का? लोकांना मोबाईलचे वेड लागले आहे असे म्हटल्यास वावगे ठरेल का? मोबाईलचा जागरुक वापर कमी झाला आहे. लोक तासन्तास मोबाईलमध्ये डोके खुपसून बसलेले दिसतात. त्याला दुर्दैवाने कोणताही वयोगट अपवाद नाही. यासंदर्भात 2021 मध्ये एक जागतिक पाहाणी करण्यात आली. मोबाईल वापरात भारत जगात पाचव्या क्रमांकावर आहे. भारतीयांनी तब्बल 645 अब्ज जास मोबाईलवर घालवले असे निष्कर्ष पाहाणीच्या अहवालात नमूद आहेत. गेल्या दोन वर्षात या तासांमध्ये निश्चितपणे वाढच झाली असेल. एवढा सगळा वेळ लोक खरेच काम करतात का? अपवाद वगळता बहुसंख्य लोक त्यांचा वेळ मोबाईलवर वाया घालवतात असे तज्ञांचे मत आहे. मोबाईलच्या वाढत्या वेडाबद्दल मार्टिन कुपर यांनीही नाराजी व्यक्त केली. लोकांनी मोबाईलचे खेळणे करुन टाकले आहे. याची अपेक्षा कधीच केली नव्हती असे त्यांनी म्हटले आहे. मोबाईलचा उपयोग का आणि कसा करायचा हे अजुनही लोकांना उमगलेले नाही याबद्दल त्यांनी माध्यमांकडे हताशा व्यक्त केली. इथेच खरी मेख दडली आहे. मोबाईलने जगाचे एका छोट्याशा खेड्यात रुपांतर केले, जग जवळ आणले असे म्हटले जाते. तथापि प्रत्यक्षात माणसे माणसांपासून दूर जात आहेत का? मोबाईलमुळे गर्दीतही माणसे एकटी झाली आहेत का? मोबाईलचा वापर किमान तासा-दोन तासांसाठी मर्यादित करण्याचा निर्णय राज्यातील अनेक ग्रामपंचायती घेत आहेत. त्या वेळेत मुलांना अभ्यास करावा यावर भरत देत आहेत. घराघरातील मोबाईल आणि दूरदर्शनचे संच बंद करण्याची वेळ झाल्याची दवंडी अनेक गावांमध्ये पिटली जात आहे. मोबाईलमुळे होणारे तोटे लोकांना कळत आहेत तसेच ते वळायला देखील हवेत. सुजाणपणाचा वेग वाढायला हवा. मोबाईलचा योग्य वापर आणि अतिरेकी वापर यातील रेषा अत्यंत धुसर आहे. ती मर्यादा प्रत्येकाने ओळखायला हवी. मोबाईलचा जागरुक वापर लोकांना शिकवण्यासाठी सुजाण आणि जाणत्यांनी पुढाकार घ्यायला हवा. लोक विशेषत: तरुण पिढी मोबाईलच्या अतिरेकातून बाहेर पडून त्याचा जागरुक वापर करायला शिकेल असा आशावाद कुपर यांनी व्यक्त केला आहे. तो लवकरात लवकर खरा ठरावा अशीच अपेक्षा जग करत असेल. 

- Advertisment -

ताज्या बातम्या