Friday, May 3, 2024
Homeनगरमहिला सुरक्षा, शेतकरी फसवणूक आणि प्रलंबित गुन्हे काढणार निकाली

महिला सुरक्षा, शेतकरी फसवणूक आणि प्रलंबित गुन्हे काढणार निकाली

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

प्रलंबित गुन्हे निकाली काढून एकही गुन्हा प्रलंबित राहणार नाही, यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे.

- Advertisement -

तसेच वाळूतस्कर आणि गुन्हेगारी टोळ्यांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महिलांची सुरक्षा, शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांची फसवणूक आणि प्रलंबित गुन्हे यावर विशेष भर देण्याचे आदेश जिल्हा पोलिसांना दिल्याची माहिती नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी दिली.

महानिरीक्षक दिघावकर यांनी सोमवारी जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांसोबत बैठक घेत जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक दत्ताराम राठोड, एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यावेळी उपस्थित होते. चोरी, घरफोड्या, जबरी चोर्‍यासारखे मालमत्तेविरोधातील गुन्हे घटले आहेत, पण दरोडे,खून आणि खुनाचा प्रयत्न यासारखे शारीरिक गुन्हे वाढले आहेत. प्रलंबित गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले आहेत.

त्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. अदखलपात्र गुन्ह्यात मोठ्या गुन्ह्याचे कारण दडलेले असते. त्यामुळे यापुढे प्रत्येक अदखलपात्र गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास केला जाणार आहे. दरोड्यासारख्या गुन्ह्यातील तसेच वाळूतस्करांना तडीपार करण्याची सूचना एसपींना केली आहे. कलम 55 चा वापर करून पोलीस अधीक्षक गुन्हेगारी टोळ्यांना तडीपार करतील.

प्रलंबित गुन्ह्यांचा तपास करण्यावर भर देण्यासोबतच शेतकर्‍यांची फसवणूक, नोकरीचे अमिष दाखवन सुशिक्षित तरूणांची फसवणूक यापुढे सहन केली जाणार आहे. असे गुन्हे तत्काळ दाखल करून त्याचा तपास तातडीने केला जाईल. महिलांच्या सुरक्षेलाही प्राधान्य दिले जाणार आहे. त्यासाठी भरोसा, दिलासा, दामिनी पथक कार्यरत करण्यात येईल. प्रलबित गुन्हे निकाली काढण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाईल.

नाशिक जिल्ह्यात डाळींब, द्राक्ष, कांदा उत्पादक शेतकर्‍यांची फसवणूक झाल्या प्रकरणात शेतकर्‍यांना आतापर्यंत 3 कोटी रुपये परत मिळवून दिले आहेत. फसवणूक प्रकरणात व्यापार्‍यांनी साडेचार कोटी रूपये दहा दिवसांत देण्याचे वचन दिले आहे. फसवणूक प्रकरणात परप्रांतीय व्यापाजयांकडून वसुलीसाठी विशेष पोलीस तपास (एसआयटी) स्थापन केली आहे. प्रसंगी त्या व्यापार्‍यांच्या मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल. यापुढे शेतकरी व सुशिक्षित तरूणांची फसवणूक सहन केली जाणार नाही असा इशारा दिघावकर यांनी दिला. नगरमध्येही याच धर्तीवर काम केले जाणार आहे.

प्रस्ताव येताच पोलीस निरीक्षक बहिरट यांच्यावर कारवाई

गुटखा प्रकरणात वादात सापडलेले श्रीरामपूरचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांची प्राथमिक चौकशी सुरू आहे. डीवायएसपी राहुल मदने हे चौकशी करत आहेत. चौकशीचा अहवाल येताच त्यांच्यावर कारवाई केली जाईल. जिल्ह्यात आतापर्यंत तीन कोटी रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. गुटखा तस्करीच्या मुळापर्यंत जाऊन ते रॅकेट उद्ध्वस्त करू. त्यासंदर्भात गुजरातमधील पोलीस महासंचालकांशीही बोलणे सुरू आहे. गुटखा तस्करांवर मोक्कांतर्गत कारवाई करता येईल का? याचाही विचार केला जाईल, अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक दिघावकर यांनी दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या