Friday, May 3, 2024
Homeअग्रलेखहेल्मेटसक्तीची उपेक्षा हे शहाणपण नव्हे!

हेल्मेटसक्तीची उपेक्षा हे शहाणपण नव्हे!

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ‘हेल्मेट नाही तर पेट्रोल नाही’ No helmets, no petrol ही मोहीम नाशिकमध्ये गेल्या आठवड्यात सुरू झाली. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ District Guardian Minister Chhagan Bhujbal यांच्या हस्ते मोहिमेचा आरंभ झाला. मोहीम यशस्वी करण्याची जबाबदारी मुख्यत्वे पोलीस आणि पेट्रोलपंपचालकांवर आहे.

नाशिककरांचा या मोहिमेला अनुकूल प्रतिसाद मिळेल, अशी संबंधितांची अपेक्षा आहे. नव्या उपक्रमाची कल्पना नागरिकांना यावी म्हणून शहरातील पोलीस अधिकारी व पोलिसांनी स्वत: हेल्मेट घातले. नंतर पालकमंत्र्यांच्या हस्ते दुचाकीत पेट्रोल भरून घेतले. पोलीस अधिकार्‍यांनी नाशिककरांना चांगला वस्तूपाठ घालून दिला. यावेळी उपस्थित आमदार सरोज आहिरे MLA Saroj Ahire यांनीही हेल्मेट घालून दुचाकीत पेट्रोल भरून घेतले.

- Advertisement -

शहरात चार आमदार असताना मोहिमेच्या आरंभावेळी हजर राहावे, असे इतर आमदारांना का वाटले नसावे? नागरिकांचा जीव वाचवणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. हेल्मेट न घातल्याने बळी गेलेल्याची संख्या किती मोठी आहे हे सांगून हेल्मेटचे महत्त्व बिंबवण्याचा प्रयत्न केला. हेल्मेट जनजागृतीसाठी स्वातंत्र्यदिनाचा चांगला मुहूर्त सरकार, प्रशासन आणि पोलिसांनी साधला, पण हेल्मेटशिवाय दुचाक्या उडवण्याचे स्वातंत्र्य उपभोगणे अनेक दुचाकीस्वारांना आवडते. हेल्मेटशिवाय पेट्रोल मिळणार नाही हे ठाऊक असूनही अनेक महाभागांना त्याचे गांभीर्य नाही. हेल्मेट न घालतासुद्धा आपण दुचाकीत पेट्रोल भरून घेऊ शकतो, अशी शेखी मिरवण्याचा प्रयत्न काही जण करतात. बहुतेक पंपांवर पोलीस तैनात आहेत.

हेल्मेट Helmet नसलेल्यांना पेट्रोल न देण्याचा नियम पंपांवरील सेवकही काटेकोरपणे पाळत असल्याचे सांगितले जाते. तथापि काही दुचाकीस्वार हेल्मेट न घालता पेट्रोल देण्याचा आग्रह धरतात. पेट्रोल दिले नाही म्हणून पंपावरील सेवकांशी हुज्जत घालण्याचे व प्रसंगी त्यांना मारहाण करण्याचे प्रकारही एक-दोन ठिकाणी घडले आहेत. सरकारने कितीही कठोर नियम केले तरी ते धुडकावणे किंवा त्यातून पळवाटा काढणे यात बहादुरी मानण्याची मनोधारणा सर्वत्र युवापिढीत बरीच फैलावलेली आहे.

हेल्मेटसक्ती असली तरी हेल्मेट Helmet वापरायचे नाही, असेच अनेकांनी ठरवले असावे. पेट्रोल घेण्यापुरती हेल्मेटची उसणवारी करण्याची अफलातून कल्पना पेट्रोल पंपांबाहेर राबवली जात असल्याचे पोलिसांच्या नजरेस आले आहे. एके ठिकाणी पेट्रोल घेण्यापुरते हेल्मेट भाड्याने देण्याची दुकानदारीही सुरू झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळत आहेत. हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे जीवावर बेतणारे आहे. सरकार सांगते, पोलीस आग्रह धरतात व दंड करतात ते दुचाकीस्वारांच्या भल्यासाठीच आहे हे सहसा कोणी नाकारणार नाही. तथापि तसे करण्याची टाळाटाळ करण्याच्या हौसेला मात्र कसलेही मोल नाही. हेल्मेट नसेल तर अपघाती मृत्यूची शक्यता वाढते. दुचाकीस्वारांना ही जाणीव कधी होणार? हेल्मेटसक्तीला पुणेकरांचा विरोध आहे. त्यांनी तो संघटितपणे प्रकटही केला.

महाराष्ट्राच्या शहाणपणाचे ठेकेदार असल्याचा पुणेकरांचा पेशवाईबाणा जगजाहीर आहे, पण इतरांनी तो कित्ता गिरवावा हे पुणेकरांना कसे मान्य होणार? म्हणून इतरांनी पुणेकरांच्या त्या भावनेला धक्का न लावणेच बरे! नियम आणि कायदे मोडण्याच्या सवयी लोकांना लागल्या आहेत. त्यांना कोण वाचवणार? सरकारने करावे तरी काय? काही भलेबुरे घडल्यावर सरकारला बोल लावायचा हा जन्मसिद्ध हक्क विश्वगुरू होण्याची महत्त्वाकांक्षा बाळगणार्या देशातील नागरिकांनी तरी आता सोडून द्यावा. दरवेळी सरकारची भूमिका चुकीची आहे, असे मानून सरकारलाच दोष देऊन कसे चालेल? हेल्मेटसक्ती लोकांच्या भल्यासाठीच आहे याची जाणीव सर्व संबंधितांना कधीतरी होईल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या