Friday, May 3, 2024
Homeनाशिकदत्तक नाशिकच्या नशिबी उपेक्षाच : ठाकरे

दत्तक नाशिकच्या नशिबी उपेक्षाच : ठाकरे

सातपूर । प्रतिनिधी Satpur

नाशिक दत्तक घेण्याची घोषणा करत भाजपाने पाच वर्षांपूर्वी महापालिकेची सत्ता मिळवली. मात्र मायेची अपेक्षा सोडा, सवती मत्सराप्रमाणे सातत्याने उपेक्षा केल्यामुळे नाशिकची पीछेहाट झाली. महत्वाचे प्रकल्प नाशिकमधून पळवले गेले असल्याची टीका करत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी प्रभागनिहाय बैठकांना प्रारंभ केला.

- Advertisement -

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘मिशन प्रभाग’ मोहीम केली सुरू असून नविन नाशिक विभागातील प्रभाग क्र. 24 व 29, सातपूर विभागातील प्रभाग क्र. 10 व 11 तसेच पश्चिम विभागातील प्रभाग क्र. 7 व 12 येथे स्थानिक पदाधिकार्‍यांसह बैठका झाल्या. या बैठकीत परिसरातील सामान्य नागरिकांनाही सहभागी करून घेण्यात आले.

यावेळी नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या. प्रामुख्याने महापालिकेशी संबंधित अधिक तक्रारी आल्या. यावेळी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे, नानासाहेब महाले, अमोल वाजे, दत्ता पाटील, संजय खैरनार, मकरंद सोमवंशी, बाळासाहेब गिते, पुष्पा राठोड, डॉ. ज्योती पाटील, जीवन रायते, गौरव गोवर्धने आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महापालिका निवडणुका दीड वर्षावर येऊन ठेपल्याने त्याची प्रचिती राष्ट्रवादीला या बैठकीत आली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे गेल्या वेळी पक्षाकडे तिकीट घेण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद होता. राष्ट्रवादी पक्षच आज अग्रक्रमी असल्याने या बैठकांमधून इच्छुकांची चाचपणी करताना प्रत्येक प्रभागात आठ ते दहा दावेदार असल्याचे पुढे आले असल्याचे वृत्त आहे.

नागरिकांनी वाचला असुविधांचा पाढा

सातपूर विभागातील नागरिकांनी पिंपळगाव बहुला मळे परिसरात पिण्याच्या पाण्याच्या समस्येसह, रस्ते, पथदिप, बिबट्यांचा वावर, रेशन कार्ड संदर्भात कॅम्प घेणे,औद्योगिक वसाहतीत पथदिप लावणे, विद्युत तारा भूमिगत करणे या समस्या प्रामुख्याने मांडल्या. झोपडपट्टी परिसरातील शौचालयाची व उद्यानाची दुरवस्था, रस्त्यावर अंधार, गुन्हेगारीत झालेली वाढ, नवीन जलकुंभ उभारणे, अनेक भागात रात्री अपरात्री पाणी येणे अशा समस्या नागरिकांनी मांडल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या