Sunday, May 5, 2024
Homeनगरबेकायदा उत्खननातून विळद घाटातील डोंगरच गायब

बेकायदा उत्खननातून विळद घाटातील डोंगरच गायब

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

डॉ. विखे फाउंडेशन या संस्थेला खेटून असलेल्या विळद घाटातील अख्खा डोंगरच बेकायदा उत्खनन करून गायब करण्यात आला आहे. भाजप खा. डॉ. सुजय विखे यांनी यासंदर्भात नगरच्या उपविभागीय अधिकार्‍यांचे लक्ष वेधले असून चौकशीचे आदेश दिले आहेत. एक डोंगर गायब होत असताना जिल्ह्यातील महसूल विभाग करतो काय, असा प्रश्न खा. विखे यांनी उपस्थित केला.

- Advertisement -

खा.डॉ. विखे यांच्या उपस्थितीत महापालिकेमध्ये मंगळवार (दि.27) केंद्र सरकार पुरस्कृत अमृत पाणी व अमृत भुयारी गटार योजना, फेज-2 पाणी योजना, पंतप्रधान आवास योजना, भूमिगत वीजपुरवठा योजना अशा विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी अमृत पाणी योजनेचा आढावा घेताना विळद घाटात बेकायदा उत्खनन करून डोंगरच गायब करण्यात आल्याचे समोर आले. यावेळी त्यांनी प्रांताधिकार्‍यांशी संपर्क साधून चौकशीचे आदेश दिले आहेत. दोषी आढळल्यास संबंधितांना नोटिसा काढाव्यात व कारवाई करावी असेही खा. विखे यांनी स्पष्ट केले.

यावेळी मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, निखिल वारे तसेच भाजप व शिंदेसेनेचे नगरसेवक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व मनपाचे अधिकारी उपस्थित होते. अमृत पाणी योजनेचे केवळ 14 किमीचे काम बाकी राहिले आहे. हे काम गेल्या वर्षापासून का थांबले आहे, याची चौकशी खा. विखे यांनी अधिकार्‍यांकडे केली. त्यावेळी अधिकार्‍यांनी अमृत योजनेसाठी 3 मीटर खोलीवर जलवाहिनी टाकली जात आहे.

मात्र, तेथे उत्खनन करून डोंगर खोदला गेल्याने 12 फुटापेक्षा अधिक खोलीवर जलवाहिन्या टाकाव्या लागणार आहेत, याकडे अधिकार्‍यांनी लक्ष वेधले. त्यावेळी खा. विखे यांनी अधिकार्‍यांना उत्खनन अधिकृतरित्या केले जात आहे की, बेकायदा केले जात आहे? त्यासाठी परवानगी घेतली गेली काय? अशी विचारणा केली. त्यावर अधिकार्‍यांनी मौन बाळगले. परिस्थिती लक्षात घेऊन खा. विखे यांनी प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवास यांना दूरध्वनी केला.

नगर तालुका तहसीलबद्दल नाराजी

बैठकीत खा. विखे यांनी नगर तालुका तहसीलदारांच्या कार्यपद्धतीबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. नगर तहसील कार्यालयात भ्रष्टाचाराचा कळस गाठला आहे. बरे झाले नगर तालुक्यापासून नगर शहरसाठी स्वतंत्र तहसील कार्यालय निर्माण झाले, टिप्पणीही खासदार विखे यांनी केली.

अंडरग्राउंड विद्युत लाईनसाठी 55 कोटी

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि केंद्रीय नगरविकास मंत्रालयाकडून शहरासाठी अंडरग्राउंड विद्युत लाईन टाकण्यासाठी 55 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी पंतप्रधान मोदी व नगर विकास खात्याचे आभार देखील मानले. येणार्‍या नवीन वर्षात या कामाला सुरुवात होणार असून येत्या मार्च महिन्यामध्ये अंडरग्राउंड विद्युत लाईनसाठी निविदा प्रक्रीया होईल व त्यानंतर पावसाळा सुरू होण्याच्या आधी कामाला सुरुवात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहरात रस्त्याच्या मधोमध असणार्‍या डीपी व विद्युत खांबांमुळे नागरिकांना जो त्रास सहन करावा लागत होता त्यातून आता शहरवासियांची सुटका होणार असल्याचे खा. विखे म्हणाले.

आधी मूलभूत प्रश्न सोडवा, नंतर….

मनपाच्या पैशा चुकीचा वापर होत असेल तर तो मी होऊ देणार नाही. दफनभूमी व स्मशानभूमीसाठी 32 कोटींची खासगी जमीन घेण्याचा ठराव मनपा महासभेने केला असला तरी शहरातील मूलभूत प्रश्न संपल्यानंतर पैसे शिल्लक राहिले तर ते भूसंपादन करा, अशी माझी भूमिका आहे. मनपाची महासभा सर्वोच्च आहे. तिने घेतलेल्या निर्णयावर खासदार म्हणून मी टीका टिपण्णी करणे योग्य नाही. पण शहराचे मूलभूत प्रश्न आधी सोडवले जावेत, असे माझे म्हणणे आहे, असे खा. विखे यांनी सांगितले.

आमचे सर्वच मुकुटमणी

भाजपच्या 16 नगरसेवकांकडे संघटन कौशल्य असल्याने कोणाच्या डोक्यात विरोधी पक्ष नेत्याचा मुकुट घालावा, असा प्रश्न आहे. पाच पांडवांसारखे हे सारे आहेत, त्यांच्यातील अर्जुनाला मी शोधत आहे. सर्वांचे कौशल्य इतके आहे की, कोणाला न्याय द्यावा, असा प्रश्न आहे. पण मनपात विरोधीपक्ष नेतेपद मिळत नाही म्हणून आमच्या 16 नगरसेवकांपैकी कोणातही नाराजी नाही वा भांडणही नाही, कोणालाही पदाची अपेक्षा वा लालसा नाही. ते सर्वजण फक्त शहर विकासासाठी कटीबद्ध आहेत, अशी उपरोधिक प्रतिक्रिया खा. डॉ. विखेंनी व्यक्त केली.

केंद्र सरकारच्या निधीतून होणार्‍या अमृत पाणी योजनेत येत्या जानेवारी 2023 अखेरपर्यंत पंप व मोटारी बसवल्या जाणार असून, त्यानंतर फेज-2 योजनेत उभारलेल्या टाक्यांतून पाणी साठवून त्याच्या वितरणाची चाचणी फेब्रुवारीअखेरपर्यंत केली जाईल. त्यामुळे येत्या उन्हाळ्यापासून नगरकरांना 24 तास पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू होईल, असा शब्द नगरचा खासदार म्हणून मी आज देतो, असे खा. डॉ. विखे यांनी स्पष्ट केले. अमृत योजनेत मुळा धरणापासून वसंत टेकडीपर्यंत पाईप टाकण्याचे काम वसंत टेकडीजवळच अवघे 12 मीटरचे शिल्लक राहिले आहे. खासगी जागेतून हे काम होणार असल्याने त्याबाबत संबंधितांशी बोलून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा विषय मार्गी लागेल, असे सांगून खा. डॉ. विखे म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या