अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात अवैध सावकारीच्या जाळ्यात अडकून शेतकरी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक शोषण होऊ नये, यासाठी प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. प्राप्त होणार्या तक्रारींचा तातडीने निपटारा करून संबंधितांना नोटीस पोहोच झाल्याची खात्री करूनच गुणवत्तेवर निर्णय घ्यावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम 2014 अंतर्गत गठीत त्रिसदस्यीय समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मंगेश सुरवसे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, गरजू नागरिक, शेतकरी व व्यावसायिकांनी अवैध सावकारांकडून कर्ज घेण्याचे टाळावे. सहकार विभागाकडून परवाना प्राप्त सावकारांकडूनच कर्ज घ्यावे. अवैध सावकारांकडून जादा व्याज आकारून त्रास दिला जात असल्यास सहकार विभागाकडे तक्रार नोंदवावी. पीडितांनी भीती न बाळगता पुढे यावे, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
दरम्यान, जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी दिलेल्या माहितीनुसार शासनाने परवानाधारक सावकारांसाठी कमाल व्याजदर निश्चित केले आहेत. यामध्ये शेतकर्यांसाठी तारण कर्ज 9 टक्के, विनातारण कर्ज 12 टक्के, बिगरशेतकरीसाठी तारण कर्ज 15 टक्के, विनातारण कर्ज 18 टक्के, असे निश्चित केले आहे. या व्याजदरापेक्षा जादा व्याज आकारल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे. जिल्ह्यातील अवैध सावकारीला आळा घालण्यासाठी प्रशासनाने सुरू केलेली ही मोहीम आता अधिक तीव्र होणार असल्याचे स्पष्ट संकेत या बैठकीतून मिळाले आहेत.
21 सावकारांवर गुन्हे; जमीन परत मिळाली
जिल्ह्यात अवैध सावकारी करणार्या 21 सावकारांविरोधात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये अधिनियमांतर्गत 20 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच 19 अपील प्रकरणांमध्ये तब्बल 25 हेक्टर 15.5 आर जमीन व 2 हजार 200 चौ.फुट बांधकाम संबंधित शेतकर्यांना परत मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. यामुळे अनेक कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.




