श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव वाळू पट्ट्यात वाळूच्या कारणावरून दोन गटात जोरदार धुमश्चक्री झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. परिसरात गोळीबार झाल्याची चर्चा होती. परंतु, चौकशी केली असता ती निव्वळ अफवा निघाली. यामध्ये एक तरुण जखमी झाला आहे. ही घटना काल सायंकाळी घडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल होत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. या प्रकरणी उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
श्रीराममपूर तालुक्यातील नायगाव गोदावरी नदीच्या परिसरात दोन गटात सुरूवातीला वादावादी झाली. नंतर हमरी-तुमरीचे पर्यावसन मोठ्या वादात झाले. यामध्ये दोन्ही गटातील अनेकजण एकमेकांच्या अंगावर धावून गेले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. या हाणामारीमध्ये दोन चार चाकी गाड्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड झाली आहे. तर एक तरुण जखमी झाला आहे. घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर हे घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी परिसराची पहाणी करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. मात्र, उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता.
तालुक्यात अवैध वाळू उपसाच्या कारणावरून गोदापट्ट्यात अनेक वेळा दोन गटात तणाव निर्माण झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. त्याचा त्रास परिसरातील सामान्य ग्रामस्थांना होत आहे. काही महिन्यापूर्वी तालुक्यातील निमगाव खैरी परिसरात दोन अशाच वाळूच्या कारणावरुन दोन गटात अशीच धुमश्चक्री झाली होती, सततच्या घडणार्या या घटनांमुळे ग्रामीण भागातील ग्रामस्थ वैतागलेले आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी या वाळू तस्करांवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील होत आहे.




