राहाता । प्रतिनिधी
लोणी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून पोलिसांनी आणखी दोन आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण १८ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामध्ये सहा डॉक्टरांचा समावेश आहे.
या गुन्ह्यात सुरुवातीला नेवासा येथील डॉ. भणगे, दोन एजंट आणि सहा कुटुंबीय अशा नऊ जणांना अटक करण्यात आली होती. आरोपींकडून एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन तसेच तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली होती. पुढील तपासात ढगे नामक आरोपीकडून आणखी एक पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त करण्यात आले. त्यानंतर अनेक एजंटांना अटक करण्यात आली.
तपासादरम्यान श्रीरामपूर येथील डॉ. कुटे व डॉ. शेख यांनाही अवैध गर्भलिंग निदान चाचणी व बेकायदेशीर गर्भपात प्रकरणात अटक करण्यात आली. पुढे पोलिसांनी पुणे येथील दोन डॉक्टर व वैद्यकीय साहित्य विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तसेच वडगाव मावळ येथील मारुती ढोरे यालाही आरोपी करून त्याच्याकडून अवैध लिंगनिदानासाठी वापरले जाणारे मशीन जप्त करण्यात आले.
पोलिसांनी शास्त्रोक्त व बारकाईने तपास करत असताना पुण्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील दोन जणांनीही अवैधरित्या सोनोग्राफी मशीन खरेदी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक रवाना करण्यात आले. पथकाने पहाटे कारवाई करून दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये डॉ. कुणाल प्रभाकर वल्टे (वय ३३), रा. सरस्वती नगर, निफाड यांचा समावेश असून त्यांचा करंजगाव येथे दवाखाना आहे. तपासात त्यांनी आरोपी ठाकरे याच्याकडून सोनोग्राफी मशीन घेतल्याचे समोर आले आहे. तसेच सागर शांताराम उल्हाळ (वय २५), रा. नांदूर मधमेश्वर, ता. निफाड यालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्या ब्लड टेस्टिंग लॅबमध्ये संबंधित मशीन ठेवण्यात आल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांतून चार सोनोग्राफी मशीन आणि तीन चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भारती तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आठरे हे करत आहेत.




