श्रीगोंदा |तालुका प्रतिनिधी| Shrigonda
तालुक्यातील लोणी व्यंकनाथ शिवारात अवैधरीत्या मातीचे उत्खनन करून वाहतूक करणार्यांवर श्रीगोंदा पोलिसांनी कारवाई केली. छाप्यात दोन जेसीबी आणि तीन हायवा डंपर अशी पाच वाहने जप्त करण्यात आली असून, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. 14 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास शेंडवाडी शिवारातील शेतात विनापरवाना माती उत्खनन सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार छापा टाकला असता जेसीबीच्या साहाय्याने माती हायवा डंपरमध्ये भरून वाहतूक केली जात असल्याचे आढळले.
पोलीस कॉन्स्टेबल देविदास सोपान फडतरे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सुशांत संजय दळवी (28, पारगाव सुद्रिक), दत्तात्रय राजेंद्र भागवत (30), संदीप राजेंद्र क्षिरसागर (27), विनोद लालसाहेब काकडे (35, तिघे रा. लोणी व्यंकनाथ) आणि संतोष अशोक अडागळे (23, रा. टाकळी लोणार) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष सानप व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार भैलुमे करीत आहेत.




