Sunday, September 27, 2026
Homeमहाराष्ट्रराज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता

राज्यात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्याची शक्यता

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी लागणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. मुंबईसह कोकण आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तर मराठवाड्यातही जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

- Advertisement -

शनिवारी सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण असून अधूनमधून रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाचा जोर वाढल्याने सकाळी मॉर्निंग वॉकसाठी आलेले मुंबईकर व पर्यटक पावसाचा आनंद घेताना दिसले. पावसाचा जोर कायम राहिला तर शहरातील सखल भागांत पाणी साचण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.

रविवार, 21 सप्टेंबर रोजी राज्यभर पावसाचा जोर कायम राहणार आहे. रायगड, रत्नागिरी, नाशिक, पुणे, सोलापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. तर मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नंदुरबार, सांगली, सातारा, कोल्हापूर, धुळे आणि जळगाव या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत पावसाची संततधार सुरू आहे. काही ठिकाणी तर पूरस्थिती निर्माण झाली असून धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. मरगा तालुक्यातील मुरूम परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. विजांच्या कडकडाटासह पावसाचा जोर वाढल्याने पहाटेपर्यंत अनेक भागात पाणी साचले. काही घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले तर रस्त्यांवर वाहतूक ठप्प झाली.

पुण्यात सततच्या हवामान बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ताप, सर्दी-खोकला, अतिसार यांसह लहान मुलांमध्ये श्वसनविषयक आजार वाढत आहेत. बालरोगतज्ज्ञांच्या मते, नवजात बालकांमध्ये ‘रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस’ चा संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाने पुढील पाच दिवस जोरदार पावसाचा इशारा दिल्याने शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहण्याची सूचना प्रशासनाकडून देण्यात येत आहे. कोकण, विदर्भ व मराठवाड्यात पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता असल्यामुळे आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. राज्यातील पावसाचा हा जोर सुरूच राहणार असल्याने नागरिकांना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.

ताज्या बातम्या

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याला मिळाला सर्वाधिक भाव

0
राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांदा आवक वाढली. कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 4800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. कांद्याची 2558 गोण्यांची...