Friday, May 3, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादमधून कोरोना हद्दपार!

औरंगाबादमधून कोरोना हद्दपार!

औरंगाबाद – aurangabad

औरंगाबाद शहरात कोरोना रुग्ण (Corona patient) संख्या नियंत्रणात येत असताना (Rural) ग्रामीण भागात मात्र कोरोना आकडा खाली यायचे नाव घेत नव्हता. दरम्यान, रविवारी प्राप्त आकडेवारीनुसार, आता औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागात केवळ चार पॉझिटिव्ह केसेस सापडल्याने ग्रामीण भागातही कोरोना घसरणीला लागल्याचे चित्र समोर आले आहे. यामुळे जिल्ह्याला काहीसा दिलासा मिळाला आहे.

- Advertisement -

गेल्या काही महिन्यांपर्यंत ग्रामीण भागात शेकडोंच्या संख्येने पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत होते. तर दुसरीकडे शहरी भागात मात्र कोरोना काढता पाय घेतल्याचे दिसून येत होते. मात्र रविवारी ग्रामीण भागातदेखील कोरोना प्रादुर्भाव कमी होत असल्याचे समोर आले आहे. रविवारी जिल्ह्यात केवळ 4 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यात गंगापूर 2 आणि वैजापूर, पैठण प्रत्येकी 1 असे केवळ चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, आढळून येणार्‍या पॉझिटिव्ह रुग्णांच्या आजूबाजूच्या 20 लोकांची तपासणी केली जात असून, आरोग्य यंत्रणा दक्ष असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शेळके यांनी सांगितले.

औरंगाबाद जिल्ह्यात इतर तालुक्यांच्या तुलनेत वैजापुरात रुग्णसंख्या अधिक असते. याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांना विचारले असता ते म्हणाले, औरंगाबाद शेजारील नगर जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढीस लागलेली आहे. वैजापूर हे औरंगाबाद जिल्ह्याच्या सीमेवर तसेच नगर जिल्ह्याच्या जवळ असल्याने येथून अनेकांची ये-जा सुरु असते. यामुळे वैजापूर तालुक्यात आकडा अधिक असतो.

यासाठी वैजापूरकरवासियांनी त्रिसूत्रीचे पालन करून दक्षता घेणे गरजेचे असल्याचे डॉ. शेळके म्हणाले. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्ण वाढीस लागले असताना आरोग्य यंत्रणेने केलेल्या उपाययोजनेमुळे बर्‍याच प्रमाणात रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दरम्यान, 23 ऑगस्ट 2021 रोजीदेखील जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच केवळ 4 पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून आली होती. त्यांनतर 10 त 30 च्या दरम्यान रुग्ण सापडत होते. मात्र काल रविवारी, 17 रोजी पुन्हा एकदा हा आकडा घसरल्याचे दिसून आले असून, केवळ चार पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याने पुन्हा एकदा आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या