Thursday, May 2, 2024
Homeब्लॉगऑस्ट्रेलियात घमासान!

ऑस्ट्रेलियात घमासान!

तोंडावर येऊन ठेपलेला विश्वचषक उंचावण्यासाठी बारा संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. 16 ऑक्टोबर ते 23 नोव्हेंबर याकाळात ऑस्ट्रेलियामध्ये टी-20 विश्वचषक रंगणार आहे. मागील वर्षीचा टी-20 विश्वचषक तसेच यंदाच्या आशिया चषक स्पर्धेतल्या कटू आठवणी विसरून भारतीय क्रिकेट संघ नव्या उमेदीने या विश्वचषकावर नाव कोरण्यासाठी सज्ज झाला आहे. काय आहेत भारतीय संघाच्या उण्या-अधिक बाजू?

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका नुकतीच संपली. भारतीय संघाने ही मालिका 2-1 अशी जिंकली. त्याआधी भारताने टी-20 विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघावर 2-1 ने मात केली. विजयाची हीच मालिका टी-20 विश्वचषक स्पर्धेतही कायम ठेवण्यासाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालचा भारतीय संघ सज्ज झाला आहे. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार असून भारतीयांना दिवाळीत चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळणार आहे. भारताच्या विश्वचषक मोहिमेची सुरुवात 22 ऑक्टोबरपासून होणार असून टीम इंडियाला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे. फक्त भारत-पाकिस्तानमधल्या क्रिकेट चाहत्यांचेच नव्हे तर अवघ्या क्रिकेट जगताचे लक्ष या सामन्याकडे लागून राहिले आहे. त्यातच गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकात भारताला पाकिस्तानकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे यंदा त्या पराभवाचे उट्टे काढण्याची संधी टीम इंडियाकडे आहे.

यंदाच्या टी-20 विश्वचषकाबद्दल बोलायचे तर स्पर्धेचे मुख्य सामने 22 ऑक्टोबरपासून सुरू होत आहेत. 16 ऑक्टोबरपासून स्पर्धेचा पहिला टप्पा सुरू होणार असून त्यात श्रीलंका, नामिबिया, वेस्ट इंडिज, स्कॉटलंड, यूएई, नेदरलँड्स, आयर्लंड, झिम्बाब्बे हे आठ संघ सुपर 12 मध्ये स्थान मिळवण्यासाठी झुंजतील. या आठपैकी चार संघ सुपर 12 मध्ये दाखल होतील आणि त्यानंतर मैदानावरच्या युद्धाला खर्‍या अर्थाने सुरुवात होणार आहे. 22 ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडदरम्यान सुपर 12 मधला पहिला सामना रंगेल. यंदा प्रत्येक संघ पूर्ण तयारीनिशी या स्पर्धेत उतरणार आहे. भारतासह ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पाकिस्तान हे संघ टी-20 विश्वचषक पटकावण्यासाठी जिवाचे रान करतील, यात शंका नाही. 2007 मध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला टी-20 विश्वचषक महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालच्या युवा टीम इंडियाने जिंकला होता. त्याला आता 15 वर्षे लोटली आहेत. यंदाच्या विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर 2007 च्या विश्वचषकाच्या आठवणीही जागवल्या जात आहेत.

- Advertisement -

मुळात क्रिकेट हा बेभरवशी खेळ. म्हणूनच इथे चुरस अगदी टिपेला पोहोचते. टी-20 क्रिकेटचे युग सुरू झाल्यानंतर तर ही चुरस आणखी वाढली. अखेरच्या षटकापर्यंतच नाही तर अखेरच्या चेंडूपर्यंत रंगणारे सामने प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहेत. त्यातच सुपर ओव्हरने मजा अधिक वाढवली आहे. टी-20 विश्वचषकात ही सगळी धमाल अनुभवता येणार आहे. या स्पर्धेसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली ‘टीम इंडिया’ही सज्ज झाली आहे. गेल्यावर्षीच्या विश्वचषकातल्या कटू आठवणी विसरून यंदा इतिहास घडवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. टी-20 विश्वचषकाआधी पार पडलेली आशिया चषक स्पर्धा आणि त्यानंतर भारतात रंगलेल्या ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिका यामुळे भारतीय संघाला आपली बलस्थाने आणि उणिवा जाणून घेता आल्या.

जसप्रीत बुमराहसारखा हुकमी एक्का दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला असला तरी संघ त्यातून सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. अखेरच्या षटकांमध्ये धावा रोखण्यात आलेले अपयश हे भारतीय संघाच्या टी-20 सामन्यांमधल्या पराभवाचे प्रमुख कारण असल्याचे दिसून आले आहे. शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाज भरपूर धावा देत असल्याचे अलीकडच्या काही सामन्यांमध्ये दिसून आले. भारतीय संघाला ही उणीव दूर करावी लागणार आहे.

टी-20 सामने अखेरच्या षटकापर्यंत रंगत असल्यामुळे मैदानात गोलंदाज आणि फलंदाज अशा दोघांचीही कसोटी लागते. त्यातच टी-20 मध्ये फलंदाजांची बाजू अधिक उजवी ठरते. मात्र अखेरच्या षटकांमध्ये धावा रोखून संघाला विजय मिळवून देण्याची कला अवगत होणेही तितकेच आवश्यक आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड या समस्येवर रामबाण उपाय शोधून काढायचा नक्कीच प्रयत्न करतील. भारताची फलंदाजी बळकट आहे. रोहित शर्मासह के. एल. राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक आणि श्रेयस अय्यर असे एकापेक्षा एक तगडे फलंदाज भारतीय संघाला मोठी धावसंख्या उभरण्यास मदत करतील. हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिकसारखे फलंदाज अखेरच्या षटकांमध्ये हाणामारी करून भारतीय संघाचा विजय साकार करू शकतात. त्यांनी अलीकडे झालेल्या स्पर्धांमध्ये ही चुणूक दाखवून दिली आहे. दिनेश कार्तिकने अखेरच्या षटकांमध्ये दर्जेदार फलंदाजीचे दर्शन घडवत भारताला सामने जिंकून दिले आहेत. दरम्यान, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, आर. अश्विनसह हार्दिक पंड्याच्या खांद्यावर गोलंदाजीचा भार असेल.

टी-20 विश्वचषक ऑस्ट्रेलियामध्ये होणार असल्यामुळे तिथल्या परिस्थितीशी आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेणे हे भारतीय संघासाठी मोठे आव्हान असेल. भारताने काही स्पर्धांमध्ये विजय मिळवला असला तरी आशिया चषकासारख्या बहुसंघीय स्पर्धेमधले भारतीय संघाचे अपयश अनेकांना सलत आहे. अशा मोठ्या स्पर्धांमध्ये यश मिळवण्यासाठी दर्जासोबतच कणखर मनोवृत्ती आणि एकीच्या भावनेची गरज भासते. मात्र आशिया चषकाच्या निमित्ताने भारताच्या या उणिवा प्रकर्षाने समोर आल्या. आगामी टी-20 विश्वचषक ही खर्‍या अर्थाने भारतीय खेळाडूंसह व्यवस्थापनासाठी मोठी कसोटीच असणार आहे.

टी-20 विश्वचषकविजेत्या ऑस्ट्रेलिया संघासह इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि पाकिस्तान या संघांचे भारतापुढे तगडे आव्हान असेल. त्यातही ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत हरवण्यासाठी भारतीय संघाला वेगळी रणनीती आखावी लागेल. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका हे संघही वेगळ्याच अवतारात दिसतील. यंदा भारताकडे तगड्या अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे. रवींद्र जडेजाचे दुखापतीमुळे संघाबाहेर पडणे, हाही टीम इंडियासाठी धक्का होता. जडेजाच्या उपस्थितीमुळे हार्दिक पंड्यावरचा ताण निश्चितच कमी झाला असता. त्यातच विश्वचषकाच्या तोंडावर जसप्रीत बुमराहला झालेली दुखापतही भारतीय संघ व्यवस्थापनच्या चिंतेत भर टाकणारी आहे. बुमराहला सक्षम पर्याय शोधावा लागणार आहे. अर्थात ही सगळी आव्हाने असली तरी त्यावर मात करून स्पर्धेत चांगली कामगिरी करून दाखवावी लागणार आहे. 2007 ची पुनरावृत्ती घडवण्यासाठी भारताला बरीच मेहनत घ्यावी लागेल, यात शंका नाही. ‘प्रयत्नांती परमेश्वर’ असे म्हटले जाते. नशीबही धाडसी माणसाच्या पाठीशी उभे राहते. त्यामुळे टीम इंडिया आत्मविश्वासाने मैदानात उतरल्यास भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न नक्कीच साकार होऊ शकते.

- Advertisment -

ताज्या बातम्या