नाशिक | जिमाका वृत्तसेवा Nashik
जनगणना ही केवळ लोकसंख्येची मोजणी नसून देशाच्या सामाजिक, आर्थिक व विकासात्मक नियोजनाचा आधारस्तंभ आहे. जिल्ह्यातील जनगणनेसाठी अचूक माहिती संकलनासाठी समन्वयाने काम करावे, असे आवहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.
जनगणना २०२७ मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालय, नाशिक येथे स्वतंत्र जनगणना कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाचे उद्घाटन आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सीमा अहिरे, आमदार नितिन पवार, आमदार सरोज अहिरे यांच्या हस्ते आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण (मालेगाव) हेमांगी पाटील (नाशिक) तहसीलदार (सामान्य प्रशासन) प्रदीप वर्पे, डॉ. दिनेश बच्छाव, सांख्यिकी अधिकारी मेघा इंगले यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना माहिती देतांना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद म्हणाले की, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेला हा जनगणना कक्ष जिल्हास्तरावर समन्वय साधण्यासाठी, माहिती संकलनाची अंमलबजावणी प्रभावी करण्यासाठी तसेच सर्व संबंधित विभागांशी सातत्यपूर्ण संपर्क ठेवण्यासाठी केंद्रबिंदू म्हणून कार्य करणार आहे. या कक्षाच्या माध्यमातून प्रशिक्षण, नियोजन, डेटा व्यवस्थापन, तांत्रिक सहाय्य व अहवाल सादरीकरण या सर्व बाबी एकाच ठिकाणी सुलभपणे पार पाडल्या जाणार आहेत.
जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले की, आगामी जनगणना प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जाणार असून मोबाईल अॅप, ऑनलाइन डेटा एंट्री व रिअल-टाईम मॉनिटरिंग यांचा समावेश असेल. त्यामुळे माहिती संकलन अधिक वेगवान, पारदर्शक व अचूक होणार आहे. यासाठी सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जनगणना कार्यात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे व जबाबदारीने काम करावे, नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे आणि प्रत्येक कुटुंबाची अचूक माहिती नोंदवावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांमध्ये जनजागृती मोहिमा राबवून जनगणनेबाबत जागरूकता निर्माण करण्यात येणार असून, विविध माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत माहिती पोहोचविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनीही जनगणना प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रसाद यांनी केले.





