मुंबई / प्रतिनिधी Mumbai
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यानुसार सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत वाढ करून पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना २५० रुपये तर आठवी ते दहावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ४०० रूपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. ही सुधारीत वाढ यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून दिली जाईल, अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी शुक्रवारी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यासंदर्भात विधान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सतीश चव्हाण यांनी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शिरसाट यांनी शिष्यवृत्तीत वाढ करण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेत वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, असे शिरसाट यांनी सांगितले.
सध्या पाचवी ते सातवीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दरमहा ६० रुपये आपण देतो. आता शिष्यवृत्ती दरमहा २५० रूपये प्रमाणे देण्यात येईल. तर आठवी आणि दहावीत मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना १०० रूपयावरून ४०० रूपये याप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याचा प्रस्ताव विभागाने तयार केला आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
विभागाने या वाढीस तत्त्वतः मान्यता दिली असली तरी कोणताही आर्थिक निर्णय घेताना वित्त विभागाची मंजुरी घेणे आवश्यक असते. त्यामुळे येत्या सोमवार किंवा मंगळवारी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन वित्त विभागाकडून मंजुरी मिळवण्याची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. ही मान्यता मिळताच यावर्षीपासून सुधारीत शिष्यवृत्ती लागू करण्यात येईल, असेही संजय शिरसाट यांनी स्पष्ट केले.





