Friday, September 20, 2024
Homeनगरभंडारदरातून विसर्ग वाढविला, मुळा नदीत 8373 क्युसेकने पाणी

भंडारदरातून विसर्ग वाढविला, मुळा नदीत 8373 क्युसेकने पाणी

भंडारदरा, कोतूळ (वार्ताहर)

- Advertisement -

पाणलोटात गुरूवारच्या तुलनेत शुक्रवारी पावसाचा जोर वाढल्याने धरणात नव्याने पाण्याची जोमाने वाढ होत आहे. परिणामी 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरातील पाणीसाठा 10520 दलघफू झाला असून काल सायंकाळी विसर्ग 7420क्युसेकने प्रवरा नदीत सोडण्यात येत आहे. त्यामुळे निळवंडे धरणातीलही पाणीसाठा वेगाने वाढत असून आज हा पाणीसाठा 65 टक्क्यांच्या पुढे जाणार आहे. दरम्यान, 1060 दलघफू क्षमतेचे आढळा धरणही भरले असून 40 क्युसेकने विसर्ग सुरू आहे.

काल सकाळी संपलेल्या 12 तासांत धरणात नव्याने 277 दलघफू पाणी आल्याने भंडारदरातील पाणीसाठा 10363 दलघफू होता. त्यामुळे विसर्ग 1928 क्युसेकने सुरू होता. पण पाऊस सुरू असल्याने आणि आवक वाढल्याने सायंकाळी धरणातील पाणीसाठ 10520 दलघफू कायम ठेवून सायंकाळी 6 वा. 4711 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. त्यानंतर आषाढ सरी जोरदार कोसळत असल्याने सायंकाळी 7 वाजता 7420 क्युसेकपर्यंत विसर्ग वाढविण्यात आला. परिणामी निळवंडे धरणाचा साठा तासागणिक वाढू लागल आहे.

हे ही वाचा : छंदावरून राजकीय वातावरण धुंद! थोरात व विखे यांची एकमेकांविरोधात जोरदार टोलेबाजी

सायंकाळी निळवंडेतील पाणीसाठा 60.40 टक्के झाला होता. पण त्यानंतर आवक आणखी वाढल्याने आज शनिवारी या धरणातील पाणीसाठा 65 टक्क्यांच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. गत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा-मिमी. भंडारदरा- 52, घाटघर 97, रतनवाडी 93, पांजरे 85. काल दिवसभरात भंडारदरात पडलेल्या पावसाची नोंद 52 मिमी झाली आहे.

हरिश्‍चंद्र गड, पाचनई, आंबितमध्ये पावसाचा जोर वाढल्याने मुळा नदीतील विसर्ग वाढत असून मुळा धरणातही पाण्याची आवक जोमाने होत आहे. 26000 दलघफू क्षमतेच्या मुळा धरणात आवक होत असल्याने काल सकाळी साठा 17033 दलघफू (65.51टक्के) झाला होता.तर सायंकाळी हा पाणीसाठा 17296 दलघफू झाला होता. सकाळी मुळा नदीतील कोतूळ येथील विसर्ग 6260 होता. त्यानंतर त्यात वाढ होऊन तो सायंकाळी 8373 क्युसेकवर पोहचला होता. त्यामुळे मुळा धरणातील पाणीसाठा आज रात्रीपर्यंत 18000 दलघफूवर जाण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा : पवारांचा नाद करू नका; खा. लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

डिंभे 81 टक्के भरले

दक्षिण नगर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या कुकडी प्रकल्पाच्या समूह धरणांमध्ये पाण्याची आवक होत आहे. काल सकाळी संपलेल्या 24 तासांत धरणांत नव्याने 804 दलघफू पाणी दाखल झाले. त्यामुळे या प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठा 15979 दलघफू (54टक्के)झाला आहे. गतवर्षी याच काळात 60 टक्के पाणीसाठा होता. 13500 दलघफू क्षमतेच्या डिंभे धरणातील पाणीसाठा 10113 दलघफू (81 टक्के) झाला आहे. येडगाव-77टक्के, माणिकडोह 37टक्के, वडज 55टक्के भरले आहे. पिंपळगाव जोगे धरणातील पाणीसाठा आज प्लसमध्ये येणार आहे. घोड धरणातील पाणीसाठा 63 टक्क्यांवर पोहचला आहे.

दारणाच्या पाणलोटात पावसाची दमदार हजेरी

राहाता (तालुका प्रतिनिधी)

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर दारणाच्या पाणलोटातील घोटी, इगतपूरी परिसरात पावसाने जोरदार बॅटिंग केली. पावसाचा जोर असल्याने धरणांमध्ये पाण्याची आवक झाली. दारणााचा विसर्ग 3361 क्युसेक वरुन 4735 क्युसेकवर नेण्यात आला.

गुरुवारी पावसाचे आगमन मंदावले होते. मात्र शुक्रवारी दिवसभर पावसाचा जोर टिकून होता. त्यामुळे घोटी, इगतपुरी परिसरातील घाटमाथ्यावरील धबधबे वेगाने वाहु लागले. यामुळे दारणात नवीन पाण्याची आवक झाली. दारणात काल सकाळी 6 पर्यंत 306 दलघफू नविन पाणी 24 तासात दाखल झाले. दिवसभर पावसाचा जोर टिकून होता.

काल सायंकाळी 6 वाजता 3361 क्युसेकने सुरु असलेला दारणाचा विसर्ग 1374 क्युसेकने वाढवून तो 4735 क्युसेक इतका करण्यात आला. दारणात भावलीतून 290 क्युसेकने विसर्ग दारणा नदीमार्गे दाखल होत आहे. तर दारणाच्या खाली कडवाचा 378 क्युसेक ने विसर्ग सुरु आहे.

दारणा 85.51 टक्क्यांवर स्थिर आहे. 7149 दलघफू क्षमतेच्या या धरणात 6113 दलघफू पाणीसाठा आहे. या हंगामात या धरणात 9.2 टीएमसीची आवक झाली. त्यापैकी 3.4 टीएमसीचा विसर्ग गोदावरीच्या दिशेने काल सकाळ पर्यंत करण्यात आला आहे. काल सकाळी मागील 24 तासात दारणाच्या भिंतीजवळ 13 मिमी, इगतपुरीला 45 मिमी पावसाची नोंद आहे. काल दिवसभर पावसाचा जोर होता. त्यामुळे धरणातून विसर्ग वाढू शकतो. दारणा समुहातील धरणांचे साठे मुकणे 38.50 टक्के, वाकी 50.48 टक्के, भाम 100 टक्के, भावली 100 टक्के, वालदेवी 78.02 टक्के, कडवा 86.02 टक्के.

गंगापूर धरण धिम्म्या गतीने भरत आहे. काल सकाळी या धरणाचासाठा 65.63 टक्के इतका झाला होता. 5630 क्षमतेच्या या धरणात 3695 दलघफू पाणीसाठा आहे. काल सकाळी सहा पर्यंत मागील 24 तासांत गंगापूर मध्ये 85 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. या हंगामात या धरणात 2.6 टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. या धरणात मात्र विसर्ग अद्याप सुरु नाही. गंगापूर धरण समुहातील कश्यपी 32.56 टक्के, गौतमी गोदावरी 63.65 टक्के, आळंदी 36.89 टक्के असे पाणी साठे आहेत. गंगापूर च्या पाणलोटातील अंबोलीला 34 मिमी, त्र्यंबकला 40, गंगापूरला 24, नाशिक ला 10 , कश्यपी 21 मिमी, गौतमी गोदावरीला 23 मिमी असा पाऊस नोंदला गेला.

खाली दारणा, कडवा धरणातील पाणी नांदूरमधमेश्‍वर बंधार्‍यात दाखल होत आहे. काल सकाळी 6 वाजता या बंधार्‍यातून जायकवाडीच्या दिशेने गोदावरीत 3155 क्युसेकने विसर्ग सुरु होता. तो काल सायंकाळी 6 पर्यंत तसाच टिकून होता. मात्र दारणातील विसर्ग काहिसा वाढल्याने रात्री 9 वाजता हा विसर्ग 4366 क्यसिकपर्यंत वाढविण्यात आला. काल सकाळी 6 पर्यंत 1 जून पासून गोदावरीत या बंधार्‍यातून 4.3 टीमएसी पाण्याचा विसर्ग जायकवाडीच्या दिशेने झाला आहे.

जायकवाडी जलाशयात काल सायंकाळी 6 वाजता पाण्याची आवक 7799 क्युसेकने होत होती. या धरणात जिवंत साठा 9.84 टक्के इतका झाला आहे. म्हणजेच उपयुक्तसाठा 7.5 टीएमसी तर मृतसह एकूण साठा 33.6 टीएमसी इतका झाला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या