Friday, September 20, 2024
Homeनगरछंदावरून राजकीय वातावरण धुंद! थोरात व विखे यांची एकमेकांविरोधात जोरदार टोलेबाजी

छंदावरून राजकीय वातावरण धुंद! थोरात व विखे यांची एकमेकांविरोधात जोरदार टोलेबाजी

संगमनेर (प्रतिनिधी)

- Advertisement -

मोठ्याचं लाडकं लेकरू असल्याने त्याचा छंदच असेल तर तो पुरवलाच पाहिजे, असा मिश्किल टोला काँग्रेस नेते, माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लगावल्यानंतर विद्यमान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी ‘आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत.’ असा जोरदार पलटवार केला.

डॉ. सुजय विखे (Dr Sujay Vikhe) पाटील यांच्या संगमनेर (Sangamner) विधानसभा मतदारसंघातील संभाव्य उमेदवारीवरून ही राजकीय टोलेबाजी झाली. एकमेकांच्या राजकीय कार्यक्षेत्रात उभे राहून विखे-थोरातांनी विधानसभेआधी एकमेकांवरील शाब्दीक हल्ल्यांना धार दिली आहे. यामुळे छंदावरून धुंद झालेल्या वातावरणातील राजकीय खेळ्या आगामी काळात अधिक गडद होतील, असे संकेत मिळाले आहेत.

लाडक्या लेकराचा छंद पुरवायला पाहिजे (Balasaheb Thorat on Radhakrishna Vikhe Patil)

मोठ्याचं लाडकं लेकरू असल्याने त्याचा छंदच असेल तर तो पुरवलाच पाहिजे या मताचा मी आहे. पक्षाने नाहीतर पालकाने तो पुरवला पाहिजे, शेवटी लेकराचा छंद आहे. वाटलं तर छंद पुरवण्याकरिता एकाच वेळी दोन्ही ठिकाणी ते उभे राहू शकतात. त्यामुळे छंद तरी पुरा होईल, असा मिश्किल टोला माजी महसूल मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी नाव न घेता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला आहे. यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधीच राजकीय तोफा डागायला सुरुवात झाली आहे.

हे ही वाचा : पवारांचा नाद करू नका; खा. लंकेंचा इशारा नेमका कोणाला?

संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे अमृतवाहिनी बँकेच्या नूतन शाखेच्या उद्घाटन समारंभानंतर पत्रकारांशी संवाद साधताना आमदार थोरात बोलत होते. जितेंद्र आव्हाड यांच्यावर झालेला हल्ला हा निषेधार्ह आहे. पुरोगामी विचार मोडून काढण्याचा आणि धर्माच्या आधारावर राजकारण करण्याचा हा प्रयत्न आहे. परंतु, अशाप्रकारची जी वृत्ती आहे ती मंडळी असे हल्ल्यासारखे भ्याड कृत्य करत असतात. त्यामुळे कायम आम्ही अशा गोष्टींचा निषेध करतो.

दूध प्रश्नांबाबतही आ. थोरात यांनी भाष्य केले. दुग्ध व्यवसायाला सरकार म्हणून कायमच मदत करावी लागते. ज्या-ज्या वेळेस अडचण येईल त्यावेळेस मदत करावी लागते. आत्तापर्यंत आम्ही मदत केलेली आहे, फक्त ती वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे. तुम्ही पाच रुपये अनुदान देणार, परंतु हे अनुदान देण्याकरीता तीस रुपये त्या दूध संघांनी दिले पाहिजे, असे बंधन तुम्ही घातले. सहकारातला कोणता दूध संघ तीस रुपये लिटरला भाव देवू शकतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

तुम्ही फक्त मदत करायचा आव आणता आणि अटी अशा घालतात की त्यातून काहीच होणार नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी खूप नाराज आहे. आताची मदत ही देखील तुटपुंजी आहे. त्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही. याचबरोबर एखादा सरपंच अथवा ग्रामपंचायत सदस्य विरोधात आहे म्हणून त्याचे पद घालवण्याचा प्रयत्न आपण कधीही केला नाही. उलट त्यांच्या मदतीसाठी आपण सतत पुढे राहतो. आता सरपंच वेगळा म्हणून पाणीपुरवठा योजनाच बंद पाडली जाते, असा टोलाही लगावला. अशा अनेक विषयांवर आमदार थोरातांनी मत व्यक्त केले.

हे ही वाचा : वेषांतरांच्या आरोपांवर अजितदादा भडकले; म्हणाले, तर मी राजकारण सोडेन…

मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम (Radhakrishna Vikhe Patil on Balasaheb Thorat)

आमच्या मुलाचा छंद जोपासायला आम्ही सक्षम आहोत. याबाबत आम्हाला आमदार बाळासाहेब थोरातांनी शिकविण्याची गरज नाही. तुमच्या घरातील मुला-मुलींचा छंद पुरविलेला चालतो. दुसऱ्याच्या मुलाची काळजी का करता? असा पलटवार महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर केला आहे. दरम्यान, संगमनेर मतदारसंघातील जनतेला नेतृत्वासाठी नवा चेहरा हवा आहे, असे ते म्हणाले.

माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे सूतोवाच केल्यानंतर आमदार थोरातांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर भाष्य करताना ना. विखे पाटील यांनी आपण तर सर्व घरदार राजकारणात उतरविलं आहे. भावापासून ते जावयापर्यंत सर्वच कुटुंब राजकारणात उतरवून तुम्ही तुमचे छंद पूर्ण केले, असा जोरदार प्रतिटोला लगावला.

डॉ. सुजय हे निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांच्या मनात काय विचार आहे तो योग्यच असेल. पण या तालुक्यात निर्माण झालेल्या हुकूमशहाने तालुका पूर्ण उद्ध्वस्त केला आहे. केवळ ठराविक लोकांचा विकास झाल्याने तालुक्याचे काय झाले आहे हे जनता रोज अनुभवत आहे. लोकांना आता नवीन चेहरा हवा आहे आणि तीच भावना लोकांनी आजच्या मेळाव्यातून व्यक्त केली आहे.

हे ही वाचा : मनोज जरांगेंना दिलासा! पुणे न्यायालयाकडून अटक वॉरंट रद्द

लोकभावनेचा आदर करायचा हीच माझी भूमिका आहे. याबाबत पक्षश्रेष्ठींना कळवून योग्य तो निर्णय ते करतील, अशा शब्दांत ना. विखे पाटील यांनी एकप्रकारे डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उमेदवारीबाबत पत्रकारांशी बोलताना सूचक भाष्य केले आहे. दरम्यान, एकाच दिवशी राजकीय प्रतिस्पर्ध्यानी एकमेकाच्या मतदारसंघात येऊन विधानसभा निवडणुकीच्या आधीच वातावरण तापवायला सुरुवात केली आहे

- Advertisment -

ताज्या बातम्या