सिन्नर । प्रतिनिधी Sinnar
नोव्हेंबर महिन्यापासूनचे आरोग्य विभागातील सफाई सेवकांचे वेतन मिळावे, सन 2024 चा बोनस मिळावा यासह विविध मागण्यांसाठी नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागासह विद्युत विभागातील सेवकांनी बुधवारपासून (दि.8) बेमुदत बंद पुकारला आहे. नगर परिषदेच्या प्रवेशद्वारावर ठिय्या देऊन आंदोलन सुरु करण्यात आले आहे.
नगर परिषदेतील घंटागाडी, कचरा जमा करणे, पाणीपुरवठा व विद्युत विभागातील कामगार व सेवकांना अनेक दिवसांपासून किमान वेतनासह वेळेवर पगार व्हावा, बोनस मिळावा यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या संदर्भात मुख्याधिकारी व विभागीय आयुक्त स्तरावर नगरपलिका कामगार कर्मचारी संघटनेच्यावतीने पाठपुरावा करण्यात येत होता. तरी प्रश्न सुटत नसल्याने संघटनेने मुख्याधिकार्यांना 1 जानेवारी रोजी निवेदन देवून प्रलंबित प्रश्न तातडीने सोडविण्याची विनंती केली होती. आरोग्य विभागातील सफाई सेवकांना नोव्हेंबर 2024 चे वेतन व 2024 चा बोनस अद्याप अदा करण्यात आलेला नाही. 7 तारखेच्या आत नोव्हेंबर व डिसेंबर महिन्याचे वेतन अदा करावे अशी मागणी या निवेदनात करण्यात आली होती.
पाणीपुरवठा व विद्युत विभागातील कामगारांना महाराष्ट्र शासनाने किमान वेतन कायद्यानुसार लागू केलेले वेतन, रजा व भत्ते अजूनही लागू करण्यात आलेले नाही. सर्व कामगारांचे वेतन दरमहा 7 तारखेच्या आत अदा करणे बंधनकारक असताना ते अदा होत नसल्याने 8 तारखेला बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेचे खजिनदार हिरामण तेलोरे व सदस्य राहूल गायकवाड यांच्या सहीने दिलेल्या या निवेदनात देण्यात आला होता.
किमान वेतन व इतर रास्त मागण्या मान्य होईपर्यंत हा संप सुरुच राहणार असून सिन्नरच्या नागरीकांनी पाणी जपून वापरावे व गैरसोय टाळून कामगारांना सहकार्य करावे असे आवाहन कामगारांनी केले आहे. या संपात पाणीपुरवठा विभागाचे राहुल गायकवाड, धोंडीराम शिंदे, राकेश देसले, गणेश गुंजाळ, संदेश खेताडे, रोहिदास टोचे, ऋषिकेश सहाणे, सुधीर नवाळे, किरण बोंबले यांच्यासह कामगार सहभागी झाले आहेत.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा