Wednesday, October 9, 2024
Homeक्रीडाIND vs BAN 2nd Test : भारताला मालिका विजयाची सुवर्णसंधी?

IND vs BAN 2nd Test : भारताला मालिका विजयाची सुवर्णसंधी?

कानपूर | Kanpur

भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) संघांमध्ये सध्या कानपूर (Kanpur) येथील ग्रीनपार्क स्टेडियमवर दुसरा निर्णायक कसोटी सामना (Test Match) खेळविण्यात येत आहे. पहिल्या दिवशी बांगलादेशने ३ बाद १०७ धावा केल्या होत्या. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली आणि दोन्ही दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला. त्यानंतर कानपूर कसोटी क्रिकेट सामना अनिर्णीत राहणार का? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांच्या मनात निर्माण झाला होता.

- Advertisement -

मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाच्या (Team India) सर्व गोलंदाजांनी बांगलादेश संघाचा पहिला डाव २३३ धावत रोखला. यात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तसेच आर अश्विन, आकाशदीप , मोहम्मद सिराजने २ गडी बाद केले. तर रवींद्र जडेजाने १ गडी बाद केला. विशेष म्हणजे रवींद्र.जडेजाने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी पूर्ण केले. बांगलादेशकडून डावखुरा फलंदाज मोमीनुल हकने चिवट प्रतिकार केला.त्याने शानदार शतक झळकावले. त्याव्यतिरिक्त शादमान इस्लाम २४, नजमुल हुसेन शांटो ३१ , मेहदी हसन मिराझ २० लिटन दास १३ धावा केल्या.

हे देखील वाचा : IND vs BAN 2nd Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ रद्द; चाहत्यांच्या आशेवर पाणी

यानंतर बांगलादेश (Bangladesh) संघाच्या धावसंख्येचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाने आक्रमक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालने पहिल्या विकेटसाठी ५५ धावांची भागीदारी केली. मात्र मेहदी हसन मिराझने रोहित शर्माला त्रिफळाचित करत बांगलादेशला पहिला बळी मिळवून दिला. रोहित शर्माने (Rohit Sharma) २३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानावर आलेल्या शुभमन गीलसोबत जयस्वालने धावसंख्या पुढे नेली. तर हसन महमूदने जयस्वालला त्रिफळाचित करत बांगलादेश संघाला दुसरे यश मिळवून दिले.जयसवालने १२ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या.

त्यानंतर यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंतला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर पाठवण्यात आले. चहापानापर्यंत भारतीय संघाने १६ षटकांत २ बाद १३८ धावा केल्या आहेत. भारतीय संघ अजूनही ९५ धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा शुभमन गील ३७ आणि रिषभ पंत ४ धावांवर नाबाद होऊन परतले. मात्र, तिसऱ्या सत्रात भारतीय संघाने शुभमन गील आणि रिषभ पंत हे दोन्ही फलंदाज झटापट गमावले. रिषभ पंत ९ तर शुभमन गील ३९ धावांवर बाद झाला. दोन्ही खेळाडूंना शाकिब अल हसनने बाद केले. यानंतर लोकेश राहुल आणि विराट कोहलीने संघाचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंनी आक्रमक फलंदाजी करताना टीम इंडियाची धावसंख्या पुढे नेली. विराट कोहली ने ४७ धावा केल्या तर लोकेश राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच रवींद्र जडेजा ८, आर अश्विन १ आणि आकाशदिपने १२ धावा केल्या.

हे देखील वाचा : Virat Kohli Record : भारताचा ‘रन मशिन’ विराट कोहलीने सचिन तेंडुलकरचा ‘तो’ विक्रम मोडत रचला इतिहास

दरम्यान, बंगालदेशकडून मेहदी हसन मिराझ आणि शाकिब अल हसनने ४ गडी बाद केले.भारताने आपला पहिला डाव ९ बाद २८५ वर घोषित केला.त्यामुळे पहिल्या डावात भारताला ५२ धावांची आघाडी मिळाली. भारतीय संघाच्या ५२ धावांच्या आघाडीला प्रत्युत्तर देताना बांगलादेश संघाच्या २ बाद २६ धावा झाल्या आहेत. बांगलादेशसंघ अजून २६ धावांनी पिछाडीवर आहे.दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मोमीनूल हक ०,शादमान इस्लाम ७ धावांवर खेळत होते. भारताकडून आर अश्विनने २ गडी बाद केले. तर हसन महमूद ४ आणि झाकीर हसन १० धावा काढून तंबूत परतले.

सलिल परांजपे, नाशिक.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या