दिल्ली । Delhi
आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये भारताने पुन्हा एकदा आपला दबदबा निर्माण करत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा धुव्वा उडवला आहे. रविवारी श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर झालेल्या या हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानवर 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारताने दिमाखात सुपर-8 फेरीत प्रवेश केला असून, दुसरीकडे पाकिस्तानच्या गोटात मात्र चिंतेचे आणि निराशेचे सावट पसरले आहे.
भारताने दिलेल्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा डाव पत्त्यासारखा कोसळला. अवघ्या 114 धावांत संपूर्ण संघ गारद झाल्याने पाक चाहत्यांसाठी हा सामना एका दुस्वप्नासारखा ठरला आहे. भारताच्या या विजयामुळे विश्वचषकाच्या इतिहासात टीम इंडियाचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. आतापर्यंत झालेल्या नऊ टी20 विश्वचषक सामन्यांपैकी भारताने आठ सामन्यांत पाकिस्तानला धूळ चारली आहे.
या मानहानिकारक पराभवानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर प्रचंड संतापलेला पाहायला मिळाला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्याने आपला सर्व राग पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष मोहसीन नक्वी आणि कर्णधार बाबर आझम यांच्यावर काढला. क्रिकेटचे साधे ज्ञान नसलेली व्यक्ती बोर्डाचे अध्यक्षपद भूषवत असल्यानेच पाकिस्तान क्रिकेटची ही अवस्था झाली आहे, अशी जहरी टीका अख्तरने केली.
शोएब अख्तर म्हणाला की, “ज्या माणसाला क्रिकेटबद्दल काहीही माहिती नाही, तो बोर्डाचा चेअरमन बनला आहे. अशा परिस्थितीत संघ प्रगती कशी करणार? तुम्ही अशा खेळाडूंना सुपरस्टार बनवले आहे, जे तुम्हाला एकही मोठा सामना जिंकून देऊ शकत नाहीत.” त्याने बाबर आझमचे नाव न घेता त्याच्यावर निशाणा साधला. अकार्यक्षम व्यक्तीला महत्त्वाच्या पदावर बसवणे हा जगातील सर्वात मोठा गुन्हा असल्याचे सांगत त्याने नक्वी यांच्यावर थेट हल्ला चढवला.
सामन्याच्या धावसंख्येवर नजर टाकल्यास, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित षटकांत 7 गड्यांच्या मोबदल्यात 175 धावा उभारल्या. भारताकडून इशान किशनने अवघ्या 40 चेंडूत 77 धावांची वादळी खेळी केली, ज्यात 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. कर्णधार सूर्यकुमार यादवने 25 धावांचे योगदान दिले.
प्रत्युत्तरादाखल मैदानात उतरलेल्या पाकिस्तानचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे हतबल दिसला. पाकिस्तानकडून उस्मान खानने सर्वाधिक 44 धावा केल्या, तर शाहीन आफ्रिदीने नाबाद 23 धावा केल्या. मात्र, इतर फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याने 18 व्या षटकातच पाकिस्तानचा डाव 114 धावांवर आटोपला. या पराभवानंतर पाकिस्तान आता गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी फेकला गेला आहे. सुपर-8 मध्ये पोहोचण्यासाठी त्यांना आता नामिबियाविरुद्धचा पुढील सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे अनिवार्य आहे.





