Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशNimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, फाशीची शिक्षा पुढील आदेशापर्यंत...

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला दिलासा, फाशीची शिक्षा पुढील आदेशापर्यंत स्थगित

मुंबई । Mumbai

येमेनमधील तुरुंगात कैदेत असलेल्या भारतातील केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिला सुनावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. १६ जुलै रोजी ही शिक्षा देण्यात येणार होती, मात्र भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीच्या प्रयत्नांमुळे आणि स्थानिक चर्चांमुळे ही शिक्षा सध्या टळली आहे.

- Advertisement -

निमिषा प्रिया, केरळच्या पालक्कड जिल्ह्यातील कोल्लेंगोडे येथील रहिवासी असून ती २००८ मध्ये रोजगारासाठी येमेनमध्ये गेली होती. येथील कामकाजादरम्यान तिची ओळख तलाल अब्दो महदी या स्थानिक नागरिकाशी झाली. दोघांमध्ये व्यावसायिक संबंध निर्माण झाले आणि त्यांनी मिळून काही व्यवसायही सुरू केला. परंतु २०१७ मध्ये तलालच्या हत्येचा आरोप निमिषा प्रिया हिच्यावर ठेवण्यात आला. या प्रकरणी येमेन पोलिसांनी तिला अटक केली आणि २०२० मध्ये येमेनमधील न्यायालयाने तिला दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली. त्यानुसार १६ जुलै २०२५ रोजी ती शिक्षा अंमलात आणली जाणार होती.

निमिषा प्रिया हिला वाचवण्यासाठी भारत सरकारकडून सतत प्रयत्न सुरू होते. मुत्सद्देगिरीच्या पातळीवर चर्चासत्रे सुरू ठेवण्यात आली. तसेच, येथील कायद्यानुसार “ब्लड मनी” देण्याचा प्रस्तावही तलालच्या कुटुंबीयांना भारत सरकारमार्फत देण्यात आला. तथापि, तलालचे नातेवाईकांनी हा प्रस्ताव नाकारला होता. या प्रकरणात भारताचे ग्रँड मुफ्ती कंठपुरम एपी अबूबकर मुसलियार यांनी सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या विनंतीनंतर येमेनमध्ये चर्चांना वेग आला. यामध्ये येमेनमधील प्रसिद्ध सुफी विद्वान शेख हबीब उमर यांचेही मार्गदर्शन लाभले.

शेख हबीब उमर यांचे प्रतिनिधी हबीब अब्दुर्रहमान अली मशहूर यांनी उत्तर येमेनमध्ये तातडीची बैठक आयोजित केली. या बैठकीस येमेन सरकारचे प्रतिनिधी, सर्वोच्च फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश, तलालचा भाऊ आणि स्थानिक आदिवासी नेते उपस्थित होते. या चर्चेदरम्यान फाशीची अंमलबजावणी काही काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या निमिषा प्रिया हिच्या फाशीची अंमलबजावणी थांबवण्यात आली असली, तरी ती कायमची रद्द करण्यात आलेली नाही. भारत सरकारकडून तिचे प्राण वाचवण्यासाठी कायदेशीर व मुत्सद्देगिरीचे प्रयत्न सुरूच आहेत. येमेनमधील स्थानिक कायद्यांनुसार, तलालच्या कुटुंबीयांचा माफीनामा आवश्यक आहे. त्यामुळे पुढील काळात ब्लड मनी किंवा सामंजस्याच्या अन्य मार्गांचा विचार केला जाण्याची शक्यता आहे.

या प्रकरणात भारत सरकार, धार्मिक नेते आणि स्थानिक समुदाय यांच्यातील समन्वयाने तातडीचा दिलासा मिळाला आहे. मात्र, निमिषा प्रिया हिच्या पूर्णपणे सुटकेसाठी अजूनही मोठ्या प्रयत्नांची गरज आहे. येत्या काही दिवसांत या प्रकरणात निर्णायक घडामोडी होण्याची शक्यता आहे. भारतातील जनतेचे आणि केरळमधील नागरिकांचे लक्ष या घटनेकडे लागलेले आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नीट पेपरफुटीतील मुख्य एजंट राहुरीचा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar देशभरात गाजत असलेल्या नीट (नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट) पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अहिल्यानगर जिल्ह्यापर्यंत पोहोचले आहेत. सीबीआयच्या पथकाने नाशिक येथील शुभम...