मुंबई | Mumbai
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर गुरुवारी रात्री चाहत्यांना क्रिकेटचा थरार पहायला मिळाला. टीम इंडियाने इंग्लंडला ७ धावांनी हरवून T20 वर्ल्ड कप २०२६ च्या फायनलमध्ये प्रवेश केला. आता ८ मार्चला रविवारी टीम इंडिया फायनलमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळणार आहे. भारताने २५४ धावांचे महाकठीण लक्ष ठेऊन देखील इंग्लंडने टीम इंडियाला विजयासाठी घाम फोडला होता. इंग्लंड धावांचा यशस्वी पाठलाग करेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. पण शेवटच्या १५ मिनिटात टीम इंडियाने गेम पलटला. टीम इंडियासाठी १८ वी ओव्हर गेमचेंजर ठरली. अंगावर काटा आणणाऱ्या मॅचमध्ये काय काय ट्विस्ट आले.
संजू सॅमनसची धडाकेबाज खेळी
भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगलेल्या सेमीफायनलमध्ये धावांचा अक्षरश: पाऊस पडला. अभिषेक शर्मा सोडला तर प्रत्येकाने उपयुक्त योगदान दिले. भारताने धावफलकावर मोठी धावसंख्या लावली. यात संजू सॅमसन हा सर्वात आघाडीवर होता. सलग दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकवले. संजू पुन्हा एकदा शतकाच्या जवळ पोहचला होता, पण विल जॅक्सनं ८९ धावांवर त्याचा बळी घेतला. हॅरी ब्रूकचा हातभार अन् संजूची धमाकेदार खेळी हा भारतीय संघासाठी सामन्यातील एक महत्त्वाचा क्षण होता. जोफ्रा आर्चरच्या गोलंदाजीवर संजू १५ धावांवर खेळत असताना जीव दान मिळाले.
अक्षर बापू पटेलचे अफलातून क्षेत्ररक्षण आणि झेल
अक्षर पटेलने भारतीय संघाला अंतिम सामन्यात पोहचवण्यात मोलाची भूमिका बजावली. आधी त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रूकचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर जेकब बेथल आणि विल जॅक्सची सेट झालेली जोडीही त्याने आपल्या फिल्डिंगच्या जोरावर फोडली. विल जॅक्सचा शिवम दुबेच्या साथीने घेतलेला झेल टीम इंडियाला गेममध्ये परत आणणारा ठरला.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
18 बॉलमध्ये 45 धावांची गरज
17 व्या षटकापर्यंत इंग्लंडच्या २०९ धावा झाल्या होत्या. विजयासाठी त्यांना १८ चेंडूत ४५ धावांची गरज होती. मुंबईच्या बॅटिंग पीचवर इंग्लंडसाठी हे काम सोपे होते. त्यात इंग्लंडचा जेकॉब बेथल मैदानात पाय रोवून थांबला होता. तर कॅप्टन सूर्यासमोर ओव्हर कुणाला द्यायची हे मोठे आव्हान होते. सूर्याने मोठा निर्णय घेतला अन् आपला हुकमी एक्का बाहेर काढला. तो म्हणजे जसप्रीत बुमराह… बुमराहने पहिल्या तीन ओव्हरमध्ये कमालीची बॉलिंग केली होती. जिथे सर्वजण १५ ते २० धावा ओव्हरला देत होते. तिथे बुमराह फक्त ८ च्या इकोनॉमीने बॉलिंग करत होता. सूर्याने इथेच डाव खेळला.
सूर्याने बॉल बुमराहच्या हाती सोपवला. टीम इंडियाचा हा डाव भारी पडणार का? असा सवाल विचारला जात होता. पण सूर्याला आपल्या रणनितीवर पूर्ण विश्वास होता. सूर्याने फिल्डिंग सेट केली अन् बुमराहने देखील प्लॅन आखला. विकेट घ्यायला जायचे नाही. बुमराहने फक्त यॉर्करवर यॉकर टाकले अन् १८ व्या ओव्हरला फक्त ६ धावा दिल्या आणि इथेच मॅच फिरली.
बुमराहनंतर हार्दिकने कळस चढवला
बुमराहचा कोटा पूर्ण झाल्यावर दोन षटके कोण टाकणार? धावांची बरसात सुरु असताना कोणता गोलंदाज त्याला अंकूश लावणार हा एक मोठा प्रश्न होता. पण हार्दिक पांड्याने त्याच्यावर सोपवलेली जबाबदारी चोख बजावली. १२ चेंडूत ३९ धावांची गरज असताना अखेरच्या षटकात त्याने शिवम दुबेला ३० धावा ठेवल्या. या षटकातही २१ धावा झाल्या. त्यामुळे १८ वे आणि १९ षटक महत्त्वाचे ठरले.
शेवटच्या षटक अन् मैदानत शांतता
शेवटच्या षटकात ३० धावांची गरज असताना सामना भारताच्या बाजूने फिरला. पण बेथल मैदानात असल्यामुळे काय होईल? याची चिंता होतीच. शिवम दुबे गोलंदाजीला आला आणि त्याच्या पहिल्याच चेंडूवर दुहेरी धाव घेण्याच्या नादात बेथलच्या अविस्मरणीय खेळीला ब्रेक लागला. ही विकेट फायनलचा मार्ग शंभर टक्के मोकळा झाला हा विश्वास देणारी होती.





